नावामुळे नियत बदलणार नाही, अनेक दहशतवादी संघटनांच्या नावातही आहे ‘इंडिया’
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या युतीने आपले नाव इंडिया असे ठेवून घेतले आहे. पण नुसत्या नावाने ‘नियत’ सुधारत नाही. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीपासून ते आताच्या काळातील अनेक दहशतवादी संघटनांच्या नावामध्ये इंडिया हा शब्द आहे. पण इंडिया हा शब्द नावात असूनही त्यांनी भारताची परिमित हानी केली आहे. त्यामुळे नावे वेगवेगळी धारण करुन लोकांना फसवले जाऊ शकत नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या युतीवर केला आहे.
मंगळवारी येथे भाजपच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या युतीच्या नव्या नावावर टीका केली. हा लोकांना फसविण्याचा मार्ग आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा डावपेच आहे, पण लोक आता भोळे राहिलेले नाहीत. त्यांना प्रत्येकाचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे हा डाव फसणार हे निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पेच हाणून पाडावेत असे आवाहन त्यांनी केले.
विरोधी पक्ष निराश
विरोधी पक्ष नैराश्याने ग्रासलेला आहे. सरकारविरोधात कोणताही ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. सरकारवर ते कोणत्याही मुद्द्यावर भरीव टीका करु शकत नाहीत. परिणामी, त्यांना आता शब्दांचे खेळ करण्यात समाधान मानावे लागत आहे. अशा खेळांमुळे लोकांची थोडी करमणूक होते. पण त्यातून कोणताही राजकीय उद्देश साध्य होत नाही. विरोधी पक्ष केवळ नकारात्मक भूमिकेतून सरकारकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीतून ही नकारात्मकता उघड होत असते. भाजपच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. आपली ध्येयधोरणे भक्कम आणि अविचल आहेत. ती विचारसरणीच आपल्या यशाला कारणीभूत ठरणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
जगभरात विश्वासाचे वातावरण
भारताच्या विद्यमान नेतृत्वाने जगाचा विश्वास कमावला आहे. हे आपल्याला नेहमी दिसून येते. अमेरिका, फ्रान्स इत्यादी देश भारताशी मोठमोठे करार करीत आहेत. भारताला संवेदनशील तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचीही त्यांची इच्छा आहे. असे इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्वी कधी घडले नव्हते. भारताचे ध्येय आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचे आहे. मात्र. त्यासाठी भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याची आवश्यकता आहे. हे आव्हान आता कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकोप्याने स्वीकारणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आमचा भारत तर त्यांचा इंडिया
विरोधी पक्षांच्या इंडियाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने भारत ही संकल्पना भक्कमपणे मांडण्यास प्रारंभ केला आहे. विरोधी पक्षांच्या इंडियामध्ये गरीबांना स्थान नाही. इंडिया ही उच्चभ्रू संकल्पना आहे. मात्र, भारत ही संकल्पना तळागाळाशी जोडली गेलेली आहे, असे प्रतिपादन भाजप नेत्यांनी केले आहे.
मणिपूरमध्ये इंडिया क्रियान्वित करणार
मणिपूरमध्ये सध्या अतिशय अस्थिर वातावरण आहे. तेथे विरोधी पक्षांच्या वतीने इंडिया ही संकल्पना आम्ही राबविणार आहोत. तेथे शांतता निर्माण करण्याचा प्रय त्न केला जाणार आहे. मणिपूरला सध्या प्रेम आणि आपुलकीची आवश्यकता आहे. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे, असे प्रतिपादन राहुल गांधींनी केले.









