वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपला पाच दिवसांचा फ्रान्स आणि अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतात आगमन झाले आहे. ते 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या काळात फ्रान्समध्ये होते. तेथे त्यांनी माहिती तंत्रज्ञान परिषदेत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह अध्यक्षस्थान स्वीकारले होते. त्यानंतर 12 फेब्रुवारीला त्यांचे अमेरिकेत आगमन झाले होते. 14 फेब्रुवारीला शुक्रवारी त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी साधारणत: अडीच तास द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरली, अशी प्रतिक्रिया अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.









