इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनी केली प्रशंसा
वृत्तसंस्था / अल्बर्टा (कॅनडा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा दौऱ्यात जी-7 परिषदेच्या निमित्ताने अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी कॅनडाचे नेते मार्क कर्नी, इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी आदी नेत्यांची द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. इटलीच्या नेत्या मेलोनी यांच्याशी त्यांची भेट आणि चर्चा विशेष महत्वाची मानली जात आहे. या चर्चेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. ‘आपण सर्वोत्तम आहात, मी आपल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करीत आहे’ असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या या संवादाचा व्हिडीओही प्रसिद्ध होत आहे. असंख्य लोकांनी तो पाहून त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी भेट झाल्यानंतर हस्तांदोलन करुन एकमेकांच्या योगक्षेमाची विचारपूस केली. आपण सर्वोत्तम आहात या मेलोनी यांच्या उद्गारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आनंद व्यक्त करुन त्यांची प्रशंसा स्वीकारल्याचे ‘थम्स अप’ चिन्ह दाखवून सूचित केल्याचेही या व्हिडीओत पहावयास मिळत आहे.
द्विपक्षीय संबंध दृढ होणार
भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत आहेत. या संबंधांचा लाभ दोन्ही देशांमधील नागरीकांना होत आहे. दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करीत असून परस्परांचा लाभ होईल अशा पद्धतीने हे संबंध वृद्धिंगत होत आहेत, असा ’एक्स’ संदेश या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केला आहे. हा संदेशही झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
एकमेकांचे चांगले मित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांची एकमेकांशी निखळ मैत्री आहे. त्यांची मैत्री हा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषयही आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दोन्ही नेते एकमेकांना अनेकदा भेटलेले आहेत. एकमेकांना भेटतानाचे आणि एकमेकांना शुभेच्छा देतानाचे त्यांचे व्हिडीओजही अनेक आहेत. त्यांची एकमेकांशी असणारी मैत्री भारत आणि इटली या दोन देशांच्या दृढ संबंधांना प्रतिबिंबित करते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.









