वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात सौदी अरेबियाला भेट देणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ते सौदी राजपुत्र सलमान यांच्या आमंत्रणावरुन त्या देशाला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
2014 मध्ये सत्तेवर आल्यापासूनचा हा त्यांचा सौदी अरेबियाचा तिसरा दौरा आहे. त्यांच्या कार्यकाळात सौदी अरेबियाशी भारताचे संबंध मोठ्या प्रमाणात सुधारले असून या नव्या दौऱ्यानंतर ते अधिकच सुदृढ होतील अशी शक्यता आहे. सध्या भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये प्रामुख्याने आर्थिक संबंध आहेत. ते धोरणात्मक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा विषयक संबंध प्रस्थापित व्हावेत, असाही प्रयत्न करण्यात येत आहे.
भारतात गुंतवणूक वाढविण्यात स्वारस्य
सौदी अरेबिया भारतात अधिकाधिक गुंतवणूक करु इच्छितो, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात सौदीची भारतातील गुंतवणूक वाढावी अशा प्रकारचे करार करण्यात येण्याची शक्यता आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे शुद्धीकरण केंद्र स्थापन व्हावे, अशी भारताची योजना असून सौदी अरेबिया या योजनेत मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.









