शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेत घेणार भाग, जिनपिंग यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस चीनमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी ते चीनला भेट देणार आहेत. 2020 मध्ये लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमासंघर्ष उद्भवल्यानंतर प्रथमच ते चीनला भेट देणार आहेत. चीनला जाण्यापूर्वी 30 ऑगस्टला ते जपानलाही भेट देतील.
मे 2020 मध्ये लडाखच्या गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत आणि चीन यांचे संबंध अतितणावग्रस्त झाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षे लडाखच्या सीमावर्ती भागामध्ये अनेक बिंदूंवर भारत आणि चीनच्या सेना एकमेकींसमोर उभ्या होत्या. 2024 च्या अखेरीस दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये समझोता झाला. त्यामुळे दोन्ही सेना त्यांच्या 2020 च्या पूर्वीच्या स्थितीनुसार मागे गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी चीन दौऱ्याला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्व देण्यात येत आहे.
2024 मध्ये भेट
भारत आणि चीन यांच्यातील तणाव निवळण्यास प्रारंभ झाल्यानंतर 23 ऑक्टोबर 2024 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची रशियातील कझान येथे भेट झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते. ती दोन्ही नेत्यांची चार वर्षांमधली प्रथम भेट होती. आता दुसरी भेट या चीनभेटीच्या वेळी होण्याची शक्यता आहे. यावेळी ते काय चर्चा करतील, याविषयी बरीच उत्सुकता आहे.
ट्रम्प यांच्या करांचे आव्हान
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास सर्वच देशांवर मोठ्या प्रमाणात व्यापार शुल्क लागू केले आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत बरीच उलथापालथ होताना दिसत आहे. त्यांनी नुकतीच भारतावर 25 टक्के व्यापारी शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. तसेच भारताने रशियाकडून इंधन तेल घेणे थांबविले नाही, तर या करांमध्ये प्रचंड वाढ केली जाईल, असा इशाराही दिला आहे. यामुळेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रस्तावित चीनभेट महत्वाची ठरत आहे.
जयशंकर यांची भेट
गेल्या जूनमध्ये भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेच्या मंत्री पातळीवरील बैठकीत भाग घेण्यासाठी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी जयशंकर यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देतील, असे निर्धारित करण्यात आले होते.
चर्चा काय होऊ शकेल…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग एकमेकांना भेटतील, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणती चर्चा होईल, या संबंधी आतापासूनच तर्कवितर्क केले जात आहेत. चर्चेत अमेरिकेच्या करांचा विषय उपस्थित होणार काय, तसेच भारत आणि चीन अमेरिकेच्या संदर्भात काही संयुक्त धोरण निर्धारित करतील काय, या विषयांवरही राजकीय आणि आर्थिक तज्ञांच्या वर्तुळांमध्ये चर्चा होत आहे.









