भारत-फ्रान्सच्या भागीदारीला 25 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी असणार आहेत. दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा होणारा बास्टिल डे हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन आहे. या दिवशी पॅरिसच्या चॅम्प्स एलिसीजमध्ये एक विशेष सैन्य परेड आयोजित केली जाते.
फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बास्टिल डेमध्ये मुख्य अतिथी म्हणून सामील होण्याचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी दौरा हा रणनीतिक सहकार्य, सांस्कृतिक आदान-प्रदान, वैज्ञानिक प्रगती, शैक्षणिक घडामोडी आणि आर्थिक सहकार्य यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाकांक्षी उद्देशांना स्थापित करत भारत-फ्रान्स भागीदारी वृद्धींगत करणारा असल्याचे विदश मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.
चालू वर्षी भारत-फ्रान्स यांच्यातील रणनीतिक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त भारतीय सशस्त्रदलांची एक तुकडी फ्रेंच सुरक्षा दलांसोबत बास्टि डे संचलनात सहभागी होणार आहे.
भारताने फ्रान्ससोबत आतापर्यंत 35 पेक्षा अधिक रणनीतिक भागीदारी करार केले आहेत. जानेवारी 1998 मध्ये भारताने फ्रान्ससोबत रणनीनिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली होती. त्याच्या काही महिन्यांनी भारताने पोखरण येथे दुसरी अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली होती.









