मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित होणाऱया राष्ट्रीय आदि महोत्सवाचे उद्घाटन आज केले जाणार आहे. राष्ट्रीय व्यासपीठावर आदिवासी संस्कृती प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नाच्या अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी हे देशातील आदिवासींच्या कल्याणासाठी पाऊल उचलत असून देशाच्या विकासाच्या या समुदायाच्या योगदानाचा योग्य सन्मान देखील करत असल्याचे पीएमओकडून म्हटले गेले. आदिवासी विषयक मंत्रालयाच्या अंतगंत येणाऱया जनजातीय सहकारी विपणन विकास संघ लिमिटेडकडून दरवर्षी आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात आदिवासी संस्कृती, शिल्प, खाद्यसंस्कृती, वाणिज्य आणि पारंपरिक कलेचे प्रदर्शन केले जाते. आदि महोत्सव 16-27 फेब्रुवारीपर्यंत आयोजित होणार आहे. आयोजनस्थळी देशभरातील आदिवासींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा प्रदर्शित केला जाणार आहे. या महोत्सवात केंद्र सरकारच्या धोरणानुसार ‘श्री अन्न’ प्रदर्शित करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.









