संरक्षणविषयक करारांना मिळणार चालना : युएईलाही भेट देणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली, पॅरिस
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथे पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी त्यांचे स्वागत केले. पॅरिस विमानतळावर मोदींचे रेड कार्पेट अंथरून स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या स्वागतासाठी पॅरिसमधील भारतीय वंशाचे लोक आधीच उपस्थित होते. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी म्हणजेच ‘बॅस्टिल डे’साठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात विविध करारांना चालना मिळणार आहे. त्यांचा दौरा 13 जुलै ते 15 जुलै असा तीन दिवस आहे. गुऊवारी फ्रान्सला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांची भेट घेतली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असतानाच मोदींचा हा विदेश दौरा होत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. राफेल विमान खरेदीच्या महत्त्वपूर्ण व्यवहारासह अन्य संरक्षण करारही या दौऱ्यात पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संरक्षणसामग्री इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. फ्रान्स सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 जुलै 2023 या दिवशी बॅस्टिल दिन संचलनाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. या संचलनात यंदा भारताच्या तिन्ही सेनादलांचे सैनिकही सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 14 जुलैला होणार आहे. फ्रान्सनंतर मोदी संयुक्त अरब अमिरातीलाही भेट देतील.









