समारंभात ‘भारत माता की जय’चा उत्स्फूर्त घोष, भारतीय वंशाच्या नागरीकांना भेटीचा विशेष आनंद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉसआयर्स येथे भव्य स्वागत करण्यात आले आहे. ते भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री अर्जेंटिनाला पोहचले. तेथील एजिजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असून त्यानंतर ते ब्राझीलला ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी जाणार आहेत. नंतर भारतात परतताना ते नामिबियालाही भेट देणार आहेत.
विमानतळावर त्यांच्या स्वागताला अर्जेंटिनाचे ज्येष्ठ मंत्री आणि उच्च अधिकारी उपस्थित होते. विमानतळावरील स्वागतानंतर ते त्यांच्या वास्तव्याच्या हॉटेलात पोहचले. तेथेही भारतीय वंशाच्या अर्जेंटिना नागरीकांना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तेथे त्यांचे ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतार्थ पारंपरिक सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुदायाला अभिवादन केले. त्यांचा हा दौरा हा भारत आणि अर्जेंटिना यांच्या संबंधांमधील नवा आणि जोमदार प्रारंभ असून दोन्ही देशांमध्ये दृढ व्यापारी आणि आर्थिक संबंधांचा पाया या भेटीमुळे घातला गेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आगळे वेगळे महत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 57 वर्षांमधील अर्जेंटिनाला भेट देणारे प्रथम भारतीय नेते आहेत. या आधी त्यांनी 2018 मध्ये जी-20 सम्मेलनाच्या निमित्ताने या देशाचा दौरा केला होता. तथापि, हा त्यांचा प्रथमच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. अर्जेंटिनाच्या विशेष आमंत्रणावरुन हा दौरा केला जात आहे.
अर्जेंटिनाच्या नेत्यांशी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई यांच्याशी सविस्तर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत संरक्षण, इंधन, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, द्विपक्षीय व्यापार, आयात निर्यात आणि इतर आर्थिक विषय उपस्थित झाले. भारत अर्जेंटिनाशी घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेत आवर्जून स्पष्ट केले, अशी माहिती देण्यात आली.
अर्जेंटिना महत्वपूर्ण सहकारी
भारताने दक्षिण गोलार्धातील देशांचा आवाज आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आणि व्यासपीठांवर नेहमीच उठविला आहे. दक्षिण गोलार्धातील देशांना समवेत घेतल्याशिवाय जगाला प्रगतीचे पुढचे टप्पे गाठता येणार नाहीत, ही भारताची भूमिका बऱ्याच काळापासून आहे. अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक महत्वाचा देश असून तो भारताचा महत्वपूर्ण सहकारी आणि भागीदार आहे. या देशाशी व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेई यांच्याशी बोलताना केले आहे.
ब्रिक्स परिषदेकडे लक्ष
आपला अर्जेंटिना दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला जाणार आहेत. ब्राझील हा अर्जेंटिनाचा शेजारी देश आहे. यावेळी ब्रिक्स परिषदेत कोणते निर्णय होणार, याकडे आता जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अर्जेंटिनाला येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद अँड टोबॅगो देशाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ प्रदान करण्यात आला. ब्रिक्स परिषद आज शनिवारपासून ब्राझीलमध्ये होत आहे. ही या संघटनेची 17 वी शिखर परिषद आहे. या परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझीलचा अधिकृत द्विपक्षीय दौरा करणार आहेत. त्यानंतर ते नामिबियाचा दौरा करुन भारतात परततील, अशी माहिती देण्यात आली आहे.
द्विपक्षीय संबंध भक्कम करणार…
ड अर्जेंटिनाशी द्विपक्षीय संबंध भक्कम करण्यासाठी भारताचा पुढाकार
ड संरक्षण, तेल आणि इंधन, व्यापार आणि गुंतवणुकीवर सखोल चर्चा
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद अँड टोबॅगोचा सर्वोच्च पुरस्कार
ड आता लक्ष महत्वपूर्ण ब्रिक्स परिषदेवर. आज शनिवारपासून प्रारंभ









