नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या 7 हजारांहून अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहिले होते.
नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय आरोग्य विभाग सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे राजीव बहल, नीती आयोगाचे अधिकारी व्ही. के. पॉल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. बैठक साधारणतः चार तास चालली. मात्र, चर्चेचा सविस्तर वृत्तांत देण्यात आला नाही. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या, उपचार यंत्रणेची सज्जता, ऑक्सिजन पुरवठय़ाची परिस्थिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण कार्यक्रम आणि इतर माहिती अधिकाऱयांकडून घेतली. केंद्र सरकारच्या सज्जतेची माहितीही केंद्रीय मंत्र्यांकडून घेतली. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रथमपासूनच योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्याचे समजते. तसेच जनतेनेही कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर पडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी प्रबोधन करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सध्या देशात 7,026 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. सहा राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात तसेच पश्चिम बंगाल ही ती राज्ये आहेत. या राज्यांना यापूर्वीच दक्षता बाळगण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.









