उत्तम संबंधांसाठी परस्परांच्या चिंतांकडे लक्ष देणे आवश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या विजयानंतर जगभरातून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झले. या अभिनंदन संदेशांमध्ये एक संदेश कॅनडाच्या सरकारचाही आहे. कॅनडाच्या सरकारने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करत केलेली टिप्पणी ही भारताला बोचणारी होती. आता पंतप्रधान मोदींनी कॅनडा सरकारच्या संदेशाला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
कॅनडाचे सरकार भारतासोबतचे संबंध वृद्धींगत करण्यास तयार आहे आणि हे संबंध मानवाधिकार, विविधता आणि कायद्याच्या शासनाच्या आधारावर असायला हवेत असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले होते. मागील वर्षी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी भर संसदेत निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. तर भारताने कॅनडाचे आरोप फेटाळले होते. तसेच कॅनडाने आरोपांच्या पुष्टीदाखल पुरावे सादर करावेत असे प्रतिआव्हान दिले होते. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याचमुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोदींना पाठविलेल्या अभिनंदन संदेशात कायद्याच्या शासनाच्या आधारावर संबंध वाढविण्याचा मुद्दा सामील करण्यात आल्याने तो भारताला लक्ष्य करणारा होता असे मानले जाते.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या ट्विटला आता मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. भारत परस्परांच्या चिंतांच्या सन्मानाच्या आधारावर कॅनडासोबत मिळून काम करण्यास तयार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे. कॅनडात खलिस्तानी आणि उग्रवादी घटकांना थारा मिळत असल्याचा आरोप भारत दीर्घकाळापासून करत आहे. भारत सरकारने अनेकदा कॅनडा सरकारला दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची सूचना केली, परंतु कॅनडाच्या सरकारने मतपेढीच्या राजकारणामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करणे टाळले आहे.









