रशियाच्या विजय दिन संचलनावेळी उपस्थित राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
9 मे रोजी मॉस्को येथील रेड स्क्वेयरमध्ये आयोजित होणाऱ्या रशियाच्या विजय दिन संचलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात. हे संचलन दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर सोव्हियत महासंघाच्या विजयाच्या 80 व्या वर्धापनदिनी आयोजित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रशिया दौऱ्यादरम्यान भारतीय सैन्याची एक तुकडी संचलनात सामील होऊ शकते.
युक्रेन युद्धावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू असताना मोदींचा हा दौरा होणार आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांना भेटून शांततेचे आवाहन केले आहे. युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात सौदी अरेबियातील रियाध येथे पहिल्या फेरीची चर्चा पार पडली आहे. रेड स्क्वेयरमध्ये होणाऱ्या संचलनात भारतीय सशस्त्र दलांची एक औपचारिक तुकडीच्या भागीदारीवर काम केले जात आहे. यामुळे या तुकडीला सरावासाठी कमीतकमी एक महिन्यापूर्वी पोहोचावे लागेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
रशियन विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी यापूर्वीच अनेक आमंत्रित देशांनी 9 मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्वत:च्या भागीदारीची पुष्टी दिल्याचे सांगितले आहे. विजय दिनाचे महत्त्व समजणाऱ्या सर्व विदेशी अतिथींचे रशिया स्वागत करणार असल्याचे रशियाच्या राष्ट्रपतींच्या माध्यम सचिवांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणानुसार 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. ही शिखर परिषद रशियाच्या अध्यक्षतेत कजान येथे आयोजित करण्यात आली होती.









