संपूर्ण दौरा ग्लोबल साउथवर केंद्रित : द्विपक्षीय करारांना प्राधान्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 10 जुलै दरम्यान आठ दिवस विदेश दौऱ्यावर गेले होते. पाच देशांचा दौरा पूर्ण करून गुरुवारी ते मायदेशी परतले आहेत. या भेटीत पंतप्रधानांनी घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाला भेट दिली. गेल्या दशकातील हा त्यांचा सर्वात मोठा राजनैतिक दौरा ठरला आहे. पंतप्रधानांच्या या विदेश दौऱ्याने भारताच्या जागतिक राजनैतिकतेत एक नवीन अध्याय जोडला गेला. तसेच भारताची जागतिक प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. या भेटीचा मुख्य उद्देश ‘ग्लोबल साउथ’शी भारताचे संबंध मजबूत करणे हा होता. तसेच व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तांत्रिक सहकार्याला चालना देणे आणि ब्रिक्स सारख्या बहुपक्षीय मंचांवर भारताचे स्थान मजबूत करण्यावरही भर देण्यात आला होता.
पंतप्रधानांचा दौरा 2 जुलै रोजी घाना येथून सुरू झाला. गेल्या 30 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता. घानामध्ये राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींचे हार्दिक स्वागत केल्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच याप्रसंगी भारतीय वंशाच्या मुलांनी संस्कृत श्लोकांचे पठण केले. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द स्टार ऑफ घाना’ प्रदान करण्यात आला. 3-4 जुलै रोजी त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी तेथील संसदेला संबोधित केली. यावेळी त्यांनी भारतीय स्थलांतरितांच्या 180 वर्षांच्या इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी त्रिनिदादच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांना ‘बिहार की बेटी’ असे संबोधले. त्रिनिदादमध्ये भारतीय स्थलांतरितांना ओसीआय कार्ड देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे सांस्कृतिक आणि परस्पर संबंध आणखी मजबूत झाले आहेत.
4-5 जुलै रोजी पंतप्रधान मोदी अर्जेंटिना येथे पोहोचले, हा 57 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा पहिला द्विपक्षीय दौरा होता. 5-8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ब्राझीलमधील 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहिले. तेथे जागतिक प्रशासन, शांतता आणि हवामान बदल यासारख्या मुद्यांवर चर्चा झाली. भेटीच्या शेवटच्या टप्प्यात 9 जुलै रोजी पंतप्रधान नामिबियामध्ये पोहोचले. 27 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्वित्शिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. त्यानंतर मोदींनी नामिबियाच्या संसदेला संबोधित करताना लोकशाही आणि तांत्रिक भागीदारीवर भर दिला.









