परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदी 20 ते 25 जून दरम्यान अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर असतील, अशी माहिती सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. 20 जून रोजी ते भारतातून रवाना होणार आहेत. सुरुवातीला ते अमेरिकेत दाखल होणार असून त्यांच्या स्वागतासाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून शेअर करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पुढील कार्यक्रमांचाही रितसर गोषवारा जाहीर करण्यात आला आहे. द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्यादृष्टीने दोन्ही देशांचे हे दौरे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी केले आहे.
22 जून रोजी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले जाईल. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय बैठक होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसलाही संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींसाठी डिनरचे आयोजन केले आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अनेक मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेणार असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. पंतप्रधानांची ही भेट अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरेल, असेही ते पुढे म्हणाले. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण आणि औद्योगिक रोडमॅप सुधारण्यास मदत होणार आहे.
24-25 रोजी इजिप्तला भेट
परराष्ट्र सचिवांनी पंतप्रधान मोदींच्या इजिप्त दौऱ्याबाबतही माहिती दिली. 24-25 जून रोजी पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा असेल. 1997 नंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची ही पहिली अधिकृत द्विपक्षीय भेट असेल. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तला भेट देत आहेत. अल-सिसी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले असता त्यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या देशाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान मोदी इजिप्तचा दौरा करत आहेत.









