► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी होणाऱ्या 20 व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. दिल्लीत लवकरच जी-20 शिखर परिषद होणार असल्याने पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत कमी कालावधीचा असेल, अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आणि रविवारी जी-20 ची शिखर परिषद पार पडणार आहे.
आसियान या संघटनेत 10 सदस्य देश असून यात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. 20 वी आसियान-भारत शिखर परिषद जकार्ता येथे पार पडणार आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी हे 20 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सामील होणार आहेत.
या शिखर परिषदेत भारत-आसियान संबंधांच्या प्रगतीची समीक्षा केली जाणार असून परस्पर सहकार्यासाठी भविष्याची दिशा निश्चित केली जाणार आहे. पूर्व आशिया शिखर परिषद आसियान देशांचे नेते आणि भारतासह त्याच्या 8 भागीदारांना क्षेत्रीय तसेच जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी प्रदान करणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारत आणि आसियानच्या मंत्र्यांदरम्यान इंडोनेशियात एक बैठक पार पडली होती. या बैठकीचा मुख्य अजेंडा आसियान-भारत व्यापार कराराची समीक्षा करणे होता.
दक्षिणपूर्व आशिया देशांची संघटना आसियान आणि भारतादरम्यान लागू मुक्त व्यापार कराराच्या समीक्षा कार्य 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.









