वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आज गुरुवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते संयुक्त अरब अमिरातीलाही भेट देतील. त्यांचा दौरा 13 जुलै ते 15 जुलै असा तीन दिवस आहे. फ्रान्समध्ये ते त्या देशाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. काही महत्वाचे संरक्षण करारही या दौऱ्यात केले जाण्याची शक्यता आहे. यात आणखी राफेल विमाने खरेदीचा व्यवहारही असेल.
फ्रान्स सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 जुलै 2023 या दिवशी बॅस्टिल दिन संचलनाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. या संचलनात यंदा भारताच्या तीन्ही सेनादलांचे सैनिकही सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 14 जुलैला होणार आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संरक्षणसामग्री इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे.









