खासदार धनंजय महाडीक : कळे येथे प्रचार दौरा
कळे वार्ताहर
दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्यासाठी जागतिक पातळीवर भारताला सक्षम केले. आता शक्तिशाली भारतासाठी मोदींना पंतप्रधान आणि मंडलिकांना खासदार करा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कळे (ता. पन्हाळा) येथे आयोजित प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटील यांनी केले.
मुश्रीफ म्हणाले, लोकसभेची निवडणूक संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नसून भारताला जागतिक महासत्ता करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व देण्यासाठी आहे. शक्तिशाली भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे आणि त्यांच्या संकल्पात सहभागी होण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करायचे आहे, असे आवाहन करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांच्या सत्ता काळातील अनेक कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची नाही तर देशाचे कणखर आणि विकासात्मक नेतृत्व ठरविणारी निवडणूक आहे. त्यामुळे असे नेतृत्वगुण असणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
उमेदवार संजय मंडलिक म्हणाले, खासदार म्हणून जिल्ह्यातील रस्ते, विमानतळ, रेल्वे सुविधा यासाठी संसदेत पाठपुरवठा करून निधी आणला. त्याचबरोबर या परिसरातील गावांच्या विकास कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी दिला. तेव्हा मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा.
यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबासो पाटील, भाजपचे के. एस. चौगले, मारुतीराव परितकर, हंबीरराव पाटील, संजय पाटील, अजय चौगले, गजानन सुभेदार, मंदार परितकर, दिग्विजय पाटील, लालासो पवार, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे, देवराज नरके, राजवीर नरके, कुंभी कारखाना व कुंभी बँकेचे सर्व संचालक यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.