जाहीर सभा अन् कायर्कर्त्यांच्या बैठकीचा घेत आहेत फीडबॅक : पक्षाच्या कार्यक्रमांवर नजर
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करूनच सामोरा जाणार आहे. याचबरोबर राज्यातील प्रचारमोहीम आता पंतप्रधान मोदींच्या देखरेखीतच पार पडणार आहे. भाजपने स्वत:च्या चार वरिष्ठ नेत्यांना निवडणूक होणाऱ्या राज्यांची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पंतप्रधान मोदी हे राजस्थान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मध्यप्रदेश-छत्तीसगड, राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्याकडे तेलंगणा तर पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याकडे राजस्थान अन् छत्तीसगडच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी असणार आहे.
पक्षाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी राजस्थानात 7 सभा घेतल्या आहेत. पुढील तयारींवरून आता ते राज्यातील खासदारांसोबत 8 ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहेत. तसेच आगामी काळात काही वरिष्ठ आमदार आणि संघटनेशी निगडित लोकांसोबत मोदी बैठक घेऊन फीडबॅक प्राप्त करणार आहेत. आमदारांची बैटक 25-26 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे पंतप्रधान मोदी हे विधानसभा निवडणुकीत सक्रीयपणे प्रचार करतात, परंतु निवडणूक रणनीतिवर थेट देखरेख ठेवत नाहीत. पक्षाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, निवडणूक प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांकडूनच रणनीति तयार केली जाते. परंतु यावेळी पक्ष कार्यकर्ते आणि पक्षसंघटनेला पंतप्रधानही संघटनेच्या एका कार्यकर्त्याप्रमाणे असल्याचा संदेश देऊ पाहत आहे.
राजस्थानात वसुंधरा राजे यांच्यासमवेत 4 वरिष्ठ केंद्रीय मंत्री, स्थानिक दिग्गज नेत्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सामील असल्याचे मानले जाते. काँग्रेस पक्षाने यावरून अनेकदा भाजपला लक्ष्य केले आहे. वरिष्ठ नेत्यांमधील चढाओढ संपविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आता सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. पंतप्रधानांचा चेहरा आणि केंद्राच्या योजना तसेच रणनीतिवर भाजपकडून ही निवडणूक लढविली जाणार आहे.
पंतप्रधान मोदींचे दौरे होणार
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर पंतप्रधान मोदींचे राजस्थानात आणखी तीन दौरे होऊ शकतात. पंतप्रधान ऑगस्ट महिन्यात तीन ठिकाणी प्रचारसभा घेऊ शकतात. यातील एक सभा खरनाल (नागौर) येथे होणार असून तेथे पंतप्रधान मोदी हे तेजाजी महाराज मंदिरात पूजा करणार आहेत. यानतंर त्यांच्या दोन सभा कोटा आणि भरतपूरमध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी नोव्हेंबर 2020 पासून आतापर्यंत राजस्थानात बांसवाडा, सिरोही, अजमेर-पुष्कर, भीलवाडा, दौसा, बीकानेर, सीकर येथे सभा घेतली आहे.
पंतप्रधान मोदींचे आवाहन
भाजपने एक ऑगस्ट रोजी जयपूर येथील सचिवालयाला घेराव घालण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु पहिल्यांदाच राज्यातील भाजपच्या आंदोलनासाठी पंतप्रधान मोदींनी ट्विट केला होता. मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते.









