केंद्रातील भाजप-रालोआ सरकारच्या अष्टवर्षपूर्ती कार्यक्रमात प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रातील भाजप सरकारचे नुकतेच आठवे वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त आयोजित भाजपच्या पत्रकार परिषद कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या राजकारणाच्या संस्कृतीमध्येच अमूलाग्र परिवर्तन केले असून समस्यांपासून पलायन न करता, त्यांना भिडणारे कार्यरत सरकार दिले आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर हे सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्यासह या पत्रकार परिषदेला स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांचाही या पत्रकार परिषदेत सहभाग होता.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार…नवभारताचे शिल्पकार, असा आशय असणाऱया एका गीताचे अनावरणही या पत्रकार परिषदेत करण्यात आले. सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येकाला मिळवून देणे हे या सरकारचे ध्येय असून आजवर गेल्या आठ वर्षांमध्ये या ध्येयापासून हे सरकार ढळलेले नाही. सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान हेच होते. पण ते यशस्वीरित्या पार करण्यात येत आहे, असेही महत्वूर्ण प्रतिपादन पक्षाध्यक्ष नड्डा यांनी केले.
त्रिसूत्रीचा अवलंब
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आमचे सरकार वाटचाल करीत आहे. प्रत्येक योजना गरिबांना डोळय़ासमोर ठेवून निर्माण करण्यात आली आहे. नमो ऍपच्या माध्यमातून देशाच्या युवावर्गाशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 31 मे 2019 या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने आपल्या दुसऱया कालावधीचा प्रारंभ केला होता. त्यानिमित्त भाजपच्या वतीने आज मंगळवारपासून पंधरा दिवस देशभरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार असून केंद्र सरकारच्या आठ वर्षांच्या कामगिरीची माहिती भारताच्या जनतेला या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.









