पुणे / प्रतिनिधी :
‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवनवीन शिखरे सर केली असून, देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी ट्रस्टकडून मोदी यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी केली. दरम्यान, या सोहळय़ाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी असून, पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळय़ात मोदी यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. सोहळय़ासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्ववस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल.
डॉ. रोहित टिळक म्हणाले, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत ‘स्वदेशी’ हा महत्त्वाचा भाग आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उद्योगांच्या प्रगतीला नवी दिशा दिली असून, देशात सुराज्य आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत, या धोरणांद्वारे पंतप्रधन मोदी यांनी मानव केंद्रित दृष्टीकोनातून विकासावर भर दिला आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी मोदी सरकारने विविध सुधारणा केल्या. यातून उद्योजक-व्यावसायिकांना व्यवसाय करणे सोपे झाले. गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत देशाने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोरोनावरील भारतीय लशीमुळे जगातील अनेक देशांना मदतीचा हात मिळाला.
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मोदी यांनीही संस्कृतीला सर्वोच्च स्थान दिले असून, काशी, केदारनाथ आणि अयोध्या येथील कामे त्याची प्रचीती देतात. लोकमान्य टिळकांनीदेखील कौशल्य विकास शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. सरकारने आखलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधरित शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे.
गेल्या नऊ वर्षांत भारताच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. जग भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. जग मानवासाठी अधिक अनुकूल बनविण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संपूर्ण विश्वाला वाटू लागले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी यांची प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे डॉ. टिळक यांनी सांगितले.
इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहनसिंगांचाही गौरव
देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना 1983 पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत समाजवादी नेते एस. एम. जोशी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, एस. एम. जोशी, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरद पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम. एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण
दरम्यान, या सोहळय़ाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रवादीवरील टीका, त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेली अभूतपूर्व फूट, अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर मोदी व पवार एकत्र येणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमाला शिंदे, फडणवीस व अजितदादांचीही उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमाला राजकीय फोडणी मिळणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.








