लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंमित टप्प्यातील 57 मतदारसंघांमध्ये आज शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आहे. त्यांच्यासमवेत अनेक केंद्रीय मंत्रीही या टप्प्यात स्पर्धेत आहेत. या टप्प्यासमवेतच यावेळच्या लोकसभा निवडणूक मतदानाची सांगता होणार आहे. आज शनिवारीच अनेक वृत्तवाहिन्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष घोषित करणार आहेत. साधारणत: सायंकाळी 7 पासून ही सर्वेक्षणे प्रसिद्ध होणार आहेत. या सर्वेक्षणांच्या आधारे, देशात कोणाचे सरकार असणार, याचे अनुमान काढता येणार आहे. त्यामुळे ही सर्वेक्षणे हा साऱ्यांच्याच औत्सुक्याचा विषय असतील. त्यानंतर प्रतीक्षा असेल ती 4 जून 2024 ची. त्या दिवशी प्रत्यक्ष मतगणना होणार असल्याने पक्षीय बलाबलाची सत्य परिस्थिती सर्वांसमोर येईल. त्यानंतर राजकीय पक्षांच्या पुढील हालचाली होऊ लागतील. सातव्या टप्प्यात वाराणसीतून मतदानाला सामोरे जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर काही मंत्री, तसेच त्यांच्या मतदारसंघांचा विस्तृत हा आढावा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी
? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोनवेळा या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्क्य 3 लाख 71 हजार 784 इतके होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते आणखी वाढून 4 लाख 79 हजार 505 मतांचे झाले.
? 2014 मध्ये त्यांनी वाराणसीसह गुजरातमधील बडोदा मतदारसंघातून निवडणुकीत भाग घेतला होता. नंतर त्यांनी बडोदा मतदारसंघ सोडला. 2019 आणि आता 2024 च्या निवडणुकीतून ते केवळ याच मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिकची अपेक्षा असून त्यांचा विजय सोपा मानण्यात येतो.
? वाराणसी मतदारसंघ 1952 पासून, अर्थात देशाच्या प्रथम लोकसभा निवडणुकीपासूनच अस्तित्वात आहे. 1952 ते 1989 या कालावधीत झालेल्या 9 लोकसभा निवणुकांपैकी काँग्रेसने सहा निवडणुकांमध्ये विजय मिळविला होता. 1967 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या मतदारसंघात विजय मिळविला.
? 1977 च्या ऐतिहासिक निवडणुकीत जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर येथून विजयी झाले होते. तर 1989 च्या निवडणुकीत दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे पुत्र आणि जनता दलाचे अनिल शास्त्री यांनी यश संपादन केले होते. 1991 पासून मात्र, भारतीय जनता पक्षाने येथे पाय रोवला आहे.
? 1991, 1996, 1998 आणि 1999 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीश चंद्र दीक्षित यांनी विजय मिळविला होता. 2004 मध्ये काँग्रेस यशस्वी ठरली होती. तर 2009 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना यश प्राप्त झाले होते.
? या मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या निर्णायक आहे. अन्य मागासवर्गीय, दलित, ब्राम्हण आदी हिंदू मतदारांची संख्या 80 टक्क्यांच्या नजीक आहे. मुस्लीम मतदार 22 टक्के आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत सुरक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय विरोधकांकडूनही गृहित धरला गेला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यामुळे कायाकल्प…
? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत यशस्वी राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. देशाचे सर्वोच्च नेते होण्यापूर्वी ते 2001 ते 2014 अशी 13 वर्षे सलग गुजरातचे मुख्यमंत्री होते. या कालावधीत त्यांनी 2002, 2007 आणि 2012 अशा तीन विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला एकहाती विजयी केले.
? जुलै 2013 मध्ये त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भारतीय जनता पक्षाने त्यांना पंतप्रधान पदाचे नेते म्हणून घोषित केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला प्रथमच लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर साहजिकच त्यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.
? 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने 2014 पेक्षाही अधिक मते आणि जागा प्राप्त करुन 303 ची संख्या गाठली आणि देदिप्यमान विजय प्राप्त केला. गेली दहा वर्षे ते सलग देशाचे सर्वोच्च प्रशासकीय नेते आहेत. यावेळी त्यांना तिसरा विजय अपेक्षित आहे.
पंतप्रधान मोदी यांचे आगळे वेगळे वैशिष्ट्या…
? एका राज्याचे सलग 13 वर्षे मुख्यमंत्री आणि त्यानंतर त्वरित देशाचे सलग 10 वर्षे सर्वोच्च पद भूषविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील एकमेव नेते आहेत. सर्वोच्चपदी त्यांच्याहून अधिक काळ राहिलेले जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी हे दोनच नेते होते. पण हे दोन्ही नेते केव्हाही मुख्यमंत्री नव्हते. मनमोहनसिंग साधारणत: 10 वर्षे सर्वोच्चपदी होते. पण तेही मुख्यमंत्री नव्हते. मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर देशाच्या सर्वोच्चपदी बसलेले विश्वनाथ प्रताप सिंग अणि एच. डी. देवेगौडा हे दोन नेते आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे चौथे नेते आहेत. तथापि, सिंग आणि गौडा यांचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे सर्वोच्च नेतेपद अल्पकालीन ठरले होते. पी. व्ही. नरसिंह राव हे ही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना देशाचे सर्वोच्च पद मिळाले. त्यांचे मुख्यमंत्रीपद अल्पकालीन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र ही दोन्ही पदे प्रदीर्घकाळ भूषविली आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर सलग तिसऱ्यांना ते सर्वोच्चपदी विराजमान झाल्यास, त्यांची सलग दुहेरी हॅटट्रिक साधली जाणार आहे.
महेंद्रनाथ पांडे (उद्योजकता आणि कौशल्यविकास राज्यमंत्री)
? उत्तर प्रदेशच्या चंदौली मतदारसंघातून महेंद्रनाथ पांडे निवडून आलेले आहेत. यांचा 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. तसेच त्यांनी पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. 66 वर्षांचे पांडे हे 1978 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. आणीबाणीच्या काळात त्यांना 5 महिने कारावासही सहन करावा लागला होता. 1991 मध्ये ते प्रथम उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडले गेले.
? चंदौली या उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून ते 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी 2019 मध्ये त्यांना केवळ 13 हजारांपेक्षा जास्त मतांनी निसटता विजय मिळाला होता. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांचे कार्य आणि स्वच्छ प्रतिमा यांचा विचार करुन त्यांना याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने वीरेंद्र सिंग आणि बहुजन समाज पक्षाने सत्येंद्र मौर्य यांना उमेदवारी दिली असून मोठी चुरस अपेक्षित आहे.
अनुप्रिया पटेल (उद्योग आणि व्यापार राज्यमंत्री)
? उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर मतदारसंघातून अनुप्रिया पटेल लोकसभेवर निवडून आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या उत्तर प्रदेशातील ‘अपना दल (सोनेलाल)’ या प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षा असून या पक्षाची भारतीय जनता पक्षाशी प्रदीर्घ काळापासून युती आहे. या पक्षाचे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या या कन्या आहेत. 2009 मध्ये सोनेलाल पटेल यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत.
? मिर्झापूर मतदारसंघ हा बहुरंगी राहिला आहे. काँग्रेस, जनसंघ, जनता पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, अपना दल, अपना दल (सोनेलाल) अशा अनेक पक्षांचे उमेदवार या मतदारसंघाने लोकसभेत पाठविले आहेत. अनुप्रिया पटेल यांनी 2014 ची निवडणूक याच मतदारसंघातून अपना दल पक्षाच्या वतीने जिंकली होती. नंतर या पक्षात फूट पडली आणि अनुप्रिया पटेल यांनी 2019 ची निवडणूक अपना दल (सोनेलाल) च्या माध्यमातून जिंकली.
अनुराग ठाकूर (केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री)
? भारतीय जनता पक्षाच्या धडाडीच्या युवा नेत्यांमध्ये अनुरागसिंग ठाकूर यांचा समावेश केला जातो. ते 49 वर्षांचे आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी युवा कल्याण आणि क्रीडा विभाग तर राज्यमंत्री या नात्याने अर्थविभागही सांभाळला आहे. त्यांचे पिता प्रेमकुमार धुमल हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते सलग चार वेळा हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेले असून यावेळी त्यांना पाचव्या विजयाची अपेक्षा आहे.
? हमीरपूर मतदारसंघ हा 1998 च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचा गढ आहे. 1998 पासून आतापर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत याच पक्षाचा येथे विजय झाला आहे. त्यापूर्वीही 1989 अणि 1991 मध्ये प्रेमकुमार धुमल येथून विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात सत्पाल रायझादा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ठाकूर यांचा जनसंपर्क, भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि कार्य यामुळे त्यांचा विजय सोपा असल्याचे तज्ञ म्हणतात.