वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती भवनमध्ये ही भेट झाली. या भेटीसंबंधीची माहिती उपराष्ट्रपती कार्यालयाकडून अधिकृत ‘एक्स’ पोस्टद्वारे देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्याचे ट्विट करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनीही अधिकृत ‘एक्स’ पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली. उपराष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर सखोल चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या दालनात पंतप्रधानांनी घेतलेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी गेल्या पंधरवड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली होती.









