► वृत्तसंस्था/ पानिपत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पानिपत येथून एलआयसी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच या कालावधीत 7 हजार ते 5 हजार रुपये दरमहा दिले जातील. याशिवाय पॉलिसी मिळाल्यावर कमिशनही दिले जाईल.
महिला सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही 10वी उत्तीर्ण महिला अर्ज करू शकते. यासाठी वयोमर्यादाही ठेवण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी महिला एलआयसीच्या शाखेत जाऊन माहिती मिळवू शकतात. तसेच अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्दा आहे. अर्ज करताना वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत जोडावी लागणार आहे. जर एखादी व्यक्ती आधीच एलआयसी एजंट किंवा कर्मचारी असेल, तर त्याचे नातेवाईक (पती/पत्नी, मुले, पालक, भावंडे इ.) या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाहीत. तसेच, एलआयसीचा कोणताही निवृत्त कर्मचारी किंवा कोणताही माजी एजंट किंवा वर्तमान एजंट या योजनेंतर्गत अर्ज करू शकत नाही.
विमा सखी योजनेअंतर्गत देशभरातील दोन लाख महिलांना वर्षभरात एलआयसी एजंट होण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून काम देण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेत आणखी 50 हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील. याशिवाय, पदवीधर झालेल्या महिलांना म्हणजेच विमा सखींनाही एलआयसीमध्ये डीओ म्हणजेच विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.









