प्रतिनिधी/ पणजी
जी-7 परिषदेच्या निमित्ताने इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. पंतप्रधानांच्या निमंत्रणानुसार पोप भारत दौऱ्यावर येतील तेव्हा ते गोव्यालाही भेट देतील, अशी अपेक्षा आहे.
गोव्यात दर दहा वर्षांनी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष प्रदर्शनाचे यंदा दहावे वर्ष असून त्यासाठी पोप यांची उपस्थिती लाभणार असल्याने या भेटीला महत्त्व आले आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून पोप फ्रान्सिस भारत दौऱ्यावर येतील तेव्हा गोव्याला देखील भेट देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांच्याशी बोलताना, लोकांची सेवा करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.









