पाहुण्यांचे उत्साही वातावरणात स्वागत : बायडेन यांच्यासमोर कथन केले कोणार्क चक्राचे महत्त्व, फोटोसेशनवेळीही वार्तालाप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जी-20 साठी ‘भारत मंडपम’मध्ये पाहुण्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी येथे स्वागतस्थळी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली. पंतप्रधानांनी ज्या नेत्यांसोबत सर्वात जास्त प्रेमळपणा दाखवला त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे विशेष होते. या सर्व नेत्यांसोबत मोदींची शाब्दिक जुगलबंदीही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही जी-20 परिषदेला हजेरी लावली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी आपल्या जागेवरून दोन पावले पुढे आले होते. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना स्वागतस्थळाच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या कोणार्क चक्राविषयी सविस्तर माहिती दिली. बायडेन यांनी याविषयी विचारणा केल्यानंतर द्वयींमध्ये बराचवेळ संवाद चालला होता.

बायडेन यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी आधी ऋषी सुनक यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. तसेच फोटोशूटही झाले. त्यानंतर तेथे पोहोचलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचेही हास्यवदन आणि हस्तांदोलन करत स्वागत करण्यात आले. काही मिनिटे बोलून पुढे निघाल्यानंतर विडोडो यांनीही पंतप्रधान मोदींना हात जोडून अभिवादन केले.
ब्राझीलचे राष्ट्रपती पत्नीसमवेत दाखल
ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ हे आपल्या पत्नीसह जी-20 परिषदेत पोहोचले. मोदींनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे आलिंगन देत स्वागत केल. तसेच त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलनही केले. मात्र, दोन्ही नेत्यांचे फोटोसेशन सुरू असताना इनासिओ यांच्या पत्नी फोटोशूट पॉईंटपासून दूर थांबल्या होत्या.
जर्मनीचे चांसलर ओलुफ स्कोल्झ जी 20 शिखर परिषदेत आय पॅच घालून पोहोचले. मोदींनी त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलतानाही दिसले. त्यांच्यापाठोपाठ परिषदस्थळी आलेले अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांचे पंतप्रधान मोदींनी आलिंगन देऊन स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमधील मैत्रीही पॅमेऱ्यात कैद झाली.
नटराजाच्या मूर्तीपासून कोणार्क चक्राची झलक
भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत जगात आपली सॉफ्ट पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याची झलक पंतप्रधान मोदींनी कोणार्क चक्राच्या प्रतिकृतीसमोर उभे राहून परदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना दिसली. तिथे भारताच्या प्राचीन संस्कृतीसोबत आधुनिकतेचा अद्भूत संगम पाहायला मिळाला.
जी-20 परिषदेसाठी भारत मंडपम तिरंग्याच्या रंगात नटला आहे. भारत मंडपममध्ये नटराजाच्या मूर्तीसह कोणार्क चक्र आणि विविध योग कलांचे चित्रण आहे. स्वागतादरम्यान मोदी परदेशी पाहुण्यांना कोणार्क चक्राचे महत्त्व सांगताना दिसले. कोणार्क चक्र हे काळाच्या सतत विस्तारणाऱ्या हालचाली, प्रगती आणि सतत बदलाचे प्रतीक आहे. कोणार्क चक्र 13व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजातही याचा वापर करण्यात आला आहे. हे कोणार्क चक्र भारताचे प्राचीन ज्ञान, प्रगत सभ्यता आणि स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्टतेचे प्रतिबिंब आहे.
भारत मंडपमच्या प्रवेशद्वारावर 28 फूट उंचीची नटराजाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मूर्ती भगवान शिवाच्या निर्मिती आणि विनाशाच्या शक्तीचे प्रतीक आहे. ही अष्टधातूची मूर्ती पारंपारिक चोल हस्तकला वापरून बनवण्यात आली आहे. तसेच, भारत मंडपममध्ये, विविध योग मुद्रा, भारताने जगाला दिलेली देणगी, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि वैज्ञानिक इतिहासाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्ती आहेत. याशिवाय, भारत मंडपमच्या रचनेतही भारतीय संस्कृती दिसून येते.
आधुनिकतेचीही किनार
भारत मंडपममध्येही आधुनिकतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कॉम्प्लेक्समध्ये एक लाख चौरस मीटरचे प्रदर्शन क्षेत्र आणि दोन लाख चौरस मीटरचे कॉन्फरन्स एरिया आहे. 3 हजार लोकांची आसनक्षमता असलेले सभागृह आणि 500 लोकांसाठी सेमिनार हॉल यासह अनेक विशेष वैशिष्ट्यो आहेत. भारत मंडपममध्ये सर्व आधुनिक सुविधांची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.









