Primary teacher died of cardiac arrest in the bus
मूळचे परभणी जिल्ह्यातील आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे देऊळ प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले हरिभाऊ रामभाऊ घोगरे (५३) हे शिक्षक गावाकडून येत असताना गोवा कदंबा बस मध्येच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी कणकवली तालुक्यातील फोंडा दरम्यान घडली.
हरिभाऊ घोगरे सरमळे शाळेत तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी डेगवे मोयझर शाळेत त्यांनी सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर ते बुधवारी सकाळी मिरज – पणजी या कदंबा गाडीने येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री शेरलेकर, विस्तार अधिकारी सौ साळगावकर, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, म ल देसाई, नारायण नाईक यांच्यासह त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तात्काळ फोंडा येथे धाव घेतली. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने त्यांच्या गावी नेण्यात आले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे.
ओटवणे / प्रतिनिधी









