शिवाजी महाराजनगर वसाहतीत ३ कोटींची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
कुंभोज प्रतिनिधी
कुंभोज येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर वसाहतीत ३ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पुरेशा डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा स्टाफ व साधनसामग्री उपलब्ध नसल्याने धूळ खात पडली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासन इकडे लक्ष देणार का, असा प्रश्न येथील लोकांना पडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज लवकर सुरू होणे गरजेचे आहे.सध्या आरोग्य केंद्राच्या परिसरात भटकी कुत्री, रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर असून परिसरात मावा, गुटखा खाऊन थुंकणे तसेच इमारतीच्या काचांवर दगड मारून काचा फोडणे असे प्रकार घडत आहेत. ही आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
छोट्या-मोठ्या आजारासाठी लोकांना कामधंदे सोडून हातकणंगले किंवा खासगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. गावातच प्राथमिक उपचार मिळाले, तर गावातील लोकांची आरोग्याची सोय होऊ शकते. एखाद्या गंभीर आजारा प्रसंगी प्राथमिक उपचार मिळाला, तर रुग्णांचे प्राण वाचू शकतात.मात्र, याबाबत प्रशासन ढिम्म आणि वेळकाढू असल्यामुळे ही इमारत आजही बेवारस स्थितीत आहे.
सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यामुळे चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा
ग्रामस्थांसह परिसरातील गावांची होती मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.