तालिबानचा नवा आदेश ः इस्लामिक नियमांनुसार पोशाख अनिवार्य
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानात मुलींना महाविद्यालयात जाण्यापासून रोखल्यावर तालिबानने आता त्यांना प्राथमिक शिक्षणाची मंजुरी दिली आहे. तालिबानने एका आदेशाच्या अंतर्गत अनेक अटींसह मुलींना शासकीय तसेच खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली तसेच सहावीपर्यंतचे शिक्षण प्राप्त करण्याची अनुमती दिली आहे.
शाळेत जाण्यासाठी मुलींना इस्लामिक नियमांच्या अंतर्गत कपडे परिधान करावे लागणार आहेत. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी शाळाही सुरू केल्या जाणार असल्याचे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून तेथील महिलांच्या अधिकारांची गळचेपी होत आहे. याप्रकरणी तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका तसेच निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे.
महिलांचे अधिकार हिरावून घेणार नसल्याचे आश्वासन तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यावर दिले होते, परंतु तरीही तेथे सातत्याने महिलांची गळचेपी होत आहे. पूर्वी मुलींच्या माध्यमिक शिक्षणावर आणि मग महाविद्यालयीन शिक्षणावर बंदी घातली गेली होती. तसेच बहुतांश महिलांचे रोजगार हिरावून घेण्यात आले आहेत. अफगाणिस्तानात आता महिलांना पुरुष सहकाऱयाशिवाय घराबाहेर पडणे अशक्य ठरत चालले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून दबाव
संयुक्त राष्ट्रसंघासह जगातील अनेक देश तालिबानवर महिलांच्या अधिकारांवरून दबाव आणत आहेत. याचमुळे तालिबानने सामाजिक सेवेतील महिलांच्या सहभागावर बंदी घातली असता संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानला दिली जाणारी मदत रोखली होती.









