पुतीन यांचा हत्या घडवून आणण्याचा होता विचार
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाचे खासगी सैन्य वॅगनरचे बंड आणि झालेल्या तडजोडीनंतर बुधवारी संध्याकाळी बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. वॅगनर ग्रूप बंड करत असताना रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी प्रिगोजिन यांची हत्या घडवून आणण्याचा विचार व्यक्त केला होता. परंतु त्यांना घाईगडबडीत कुठलाही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता, यानंतरच तडजोड होऊ शकल्याचा दावा लुकाशेंको यांनी केला आहे.
फोनवरून संपर्क साधत लुकाशेंको यांनी संघर्षाऐवजी कथित स्वरुपात शांततेचे आवाहन केले होते. तर वॅगनर आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन हे बेलारुस येथे दाखल झाले आहेत. तर रशियाने प्रिगोजिन विरोधातील सर्व गुन्हे मागे घेतले ओत. करारानुसार वॅगनर ग्रूपकडील मोठी शस्त्रास्त्रs आणि हार्डवेअर परत मिळविण्याची तयारी सुरू असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
रशियाने प्रिगोजिन यांना माफीचे आश्वासन दिले असले तरीही पुतीन त्यांना माफ करतील यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. पुतीन यांना स्वत:चे टीकाकार तसेच बंडखोरांना संपविण्यासाठी ओळखले जाते. पुतीन यांनी मागील काही वर्षांमध्ये स्वत:च्या अनेक विरोधकांना तुरुंगात डांबले आहे. लुकाशेंको हे पुतीन यांच्या हातचे बाहुले असल्याचे प्रिगोजिन ओळखून आहेत. याचमुळे बेलारुस त्यांच्यासाठी अधिक काळ सुरक्षित असणार नाही.
तर दुसरीकडे रशियाच्या कुख्यात खासगी सैन्याच्या प्रमुखांचे बंड आणि त्यानंतर रक्ताचा एक थेंबही न सांडता पुतीन यांच्याकडून हे बंड रोखण्यात आल्याच्या घटनेचा वेगळा अर्थ काढला जात आहे. बंडाचा देखावा करत स्वत:च्या विरोधकांची ओळख पटविण्याचा पुतीन यांचा हा डाव असू शकतो असे मानले जात आहे.