खेळपट्टीवर नांगर घालून उभं राहण्याचं विलक्षण कसब असलेला, संघहिताला जास्त महत्त्व देणारा चेतेश्वर पुजारा हा मध्यंतरी भारताचा डाव सावरण्याच्या बाबतीत हुकमी एक्का होता…राहुल द्रविडची जागा भरून काढू शकणारा खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं. पण नंतर त्याच्यावर टीका होऊ लागली ती खूपच संथ गतीनं खेळत असल्याची…असं असलं, तरी भारताच्या वाट्याला न्यूझीलंड अन् पुढं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामुष्की येत असताना त्याची उणीव भेडसावल्याशिवाय राहिली नाही. तरीही इंग्लंड दौऱ्यात डावलल्यानंतर त्यानं आता आपल्या कारकिर्दीपुढं पूर्णविराम लावणं पसंत केलंय…
चेतेश्वर पुजारा…गेल्या 13 वर्षांपासून भारतातल्या कसोटी क्रिकेटवर ठसा उमटविलेला दिग्गज खेळाडू…देवानं पाच दिवसीय सामन्यांसाठी निर्माण केलेली खास व्यक्ती…37 वर्षीय पुजारा आता कसोटीतून निवृत्त झालाय अन् एक अध्याय संपलाय…त्यानं निवृत्ती जाहीर केली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून…चेतेश्वरनं 2010 च्या ऑक्टोबर महिन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत 89 चेंडूंत नाबाद 72 धावांची खेळी केली होती आणि तो 2023 साली जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम सामना ओव्हलवर खेळला कांगारुंविरुद्धच. दोन वर्षांपूर्वी झालेली ती लढत हा त्याचा शेवटचा कसोटी सामना…
‘माझं लहानसं गाव आहे ते राजकोट जिह्यात. मी नेहमीच स्वप्नं पाहिली ती भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची. परंतु हा खेळ भरभरून देईल याची मात्र कल्पना नव्हती. असंख्य संधी, अनुभव, प्रेम अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या राज्याचं व महान देशाचं करता आलेलं प्रतिनिधीत्व. भारतीय जर्सी परिधान करून राष्ट्रगीत म्हणणं आणि प्रत्येक डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणं यांचं वर्णन शब्दांत बसविणं निव्वळ अशक्य. पण सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असल्यानं मी सुद्धा भारतीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपांचा निरोप घेतोय’, चेतेश्वर पुजाराचे शब्द…
सतत पाच वर्षं कसोटीत पहिला क्रमांक टिकवून ठेवणाऱ्या, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर लागोपाठ त्यांना दोन वेळा पराभूत करणाऱ्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन यांच्यासह पुजाराचा समावेश होता. शर्मा व कोहलीनं मे महिन्यात निवृत्ती स्वीकारली, तर अश्विननं त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सर्वांना ‘गूडबाय’ म्हटलं अन् आता चेतेश्वरनं देखील त्याच मार्गानं जाण्याचा निर्णय घेतल्यानं भारतीय कसोटी इतिहासातील एक पर्व संपलंय…विश्लेषकांनी त्याच्याकडे नेहमीच पाहिलं ते तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या राहुल द्रविडचा पर्याय म्हणून. अव्वल दर्जाचा बचाव, प्रचंड संयमानं फलंदाजी करण्याची क्षमता आणि संघाला सावरण्याची कला यांच्या जोरावर त्यानं नेहमीच बाजी मारली…
स्थानिक स्पर्धांमध्ये खोऱ्यानं धावा जमविल्यामुळं चेतेश्वर पुजारानं नाव कमावलं ते ‘सौराष्ट्रचं रन मशिन’ म्हणून. त्याला नेहमीच मार्गदर्शन मिळालं ते वडील अरविंद पुजारा यांचं. सौराष्ट्रनं 2019-20 व 2022-23 मोसमांत रणजी चषक स्पर्धेचं जेतेपद मिळविलं अन् त्यात फार मोठा हात होता तो पुजाराचाच. खेरीज 2012-13 आणि 2015-16 मोसमांत सौराष्ट्रानं रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली ती त्याच्या कामगिरीमुळं. ‘टाईम्स ऑफ इंडिया क्रिकेट शिल्ड’मध्ये धावांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू ‘इंडियन ऑईल’चं प्रतिनिधीत्व करत असल्यानं विश्लेषक त्याला ‘इंडियन ऑईल’चा ‘डॉन ब्रॅडमन’ही म्हणायचे…
गेल्या दोन वर्षांत मात्र त्याच्या हालचालींची गती मंदावलीय हे स्पष्टपणे दिसून येत होतं आणि या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी संघातलं स्थान सातत्यानं टिकविणं त्याला जमलं नाही. विशेष म्हणजे पश्चिम विभागानं देखील चेत़ेश्वर पुजाराला दुलिप करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या संघातून वगळलं. टीकाकारांच्या मते, नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली असती, तर पाचव्या कसोटीनंतर त्यानं निवृत्त होण्याचा मार्ग पत्करला असता…चेतेश्वर ‘इंडियन प्रीमियर लीग’, एकदिवसीय सामन्यांत फारसा खेळलेला नसल्यानं त्याचं सारं लक्ष केंद्रीत झालेलं असायचं ते कसोटी सामन्यांवर…
जगभरात टी-20 लीग आणि ‘आयपीएल’ची लोकप्रियता वाढीस लागलेली असताना मर्यादित षटकांचं क्रिकेट हे कधीही पुजाराच्या पठडीला सोयीस्कर ठरलं नाही. ऑगस्ट, 2013 ते जून 2014 दरम्यान तो केवळ पाच एकदिवसीय सामने खेळला आणि त्याला त्यात काढता आल्या अवघ्या 51 धावा. ‘आयपीएल’मध्ये तो तीन संघांतर्फे झळकला. कोलकाता नाईट रायडर्स (2010), रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (2011 ते 2013) अन् किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स, 2014)…2021 साली चेन्नई सुपर किंग्स संघाचा तो भाग होता, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा तो शेवटचा 50 षटकांचा सामना खेळला डिसेंबर, 2023 मध्ये, तर टी-20 लढत नोव्हेंबर, 2022 मध्ये…या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी संघातून वगळल्यानंतर त्यानं निवृत्त होण्याचा विचार सुरू केला…
त्याच्यापूर्वीच चेतेश्वर पुजारानं मोर्चा वळविला होता तो काऊंटी क्रिकेटकडे अन् तिथं ससेक्ससोबत एक उत्तम कारकीर्द अनुभवली. त्यानं तिथं तीन हंगाम (2022 ते 2024) घालवले आणि 18 सामन्यांतून 64.24 सरासरीनं केल्या त्या 1,863 धावा. यामध्ये आठ शतकं व तीन अर्धशतकांचा समावेश. त्याची उत्कृष्ट कामगिरी नोंदविली गेली ती पदार्पणाच्या हंगामात. त्यात त्यानं डर्बिशायरविऊद्ध 231 धावांची खेळी केली…पुढच्या हंगामात त्याच्याकडे कर्णधारपदाची सूत्रं सोपविण्यात आली अन् त्या भूमिकेत वावरताना पदार्पणातच त्यानं डरहॅमविऊद्ध शतक ठोकलं…गेल्या वर्षी पुजारानं ससेक्ससाठी सहा प्रथम श्रेणी काउंटी सामन्यांमध्ये 501 धावा केल्या…
यादरम्यान चेतेश्वर पुजारा वळला तो सामालोचनाच्या दिशेनं. नुकत्याच संपलेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात त्यानं ती जबाबदारी सांभाळली. चेतेश्वरनं आपल्या वडिलांच्या साहाय्यानं किकेट अकादमीची राजकोट इथं स्थापना केलीय. भविष्यात त्याचा प्रशिक्षक बनण्याचा विचार आहे काय ?…पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणतोय, ‘मी अजूनपर्यंत विचार केलेला नाहीये. कारण मी नुकताच क्रिकेटमधून निवृत्त झालोय. भविष्यात मिळणारी प्रत्येक संधी ही महत्त्वाचीच असेल’…
ऑस्ट्रेलियात 2018-19 व 2021 मध्ये मिळविलेल्या विजयांत महत्त्वाची भूमिका होती ती चेतेश्वरचीच. 2018-19 मध्ये तर त्यानं अॅडलेड, मेलबर्न, सिडनी इथं लागोपाठ तीन शतकांची नोंद केली आणि 74.42 धावांच्या सरासरीनं चार कसोटींत 521 धावांचा सडा पाडला…त्यानंतर दोन वर्षांनी पुजारानं 271 धावा जमविल्या त्या तब्बल 928 चेंडूंचा सामना करून. त्या दौऱ्यात पॅट कमिन्स, हेझलवूड, मिचेल स्टार्क या त्रिकुटाला सामोरं जात त्यानं तीन अर्धशतकं फटकावली. पण सर्वांना अजूनही आठवण आहे ती ब्रिस्बेनमधील गब्बा मैदानावर 211 चेडूंत 56 धावा काढताना चेतेश्वरनं खाल्लेल्या उसळत्या चेंडूंच्या प्रसादाची. त्या कसोटीत भारतानं विदेशातील एक सर्वोत्तम विजय नेंदविला…
पुजाराच्या काही डावांचं विस्मरण होणं कठीण…2015 मध्ये कोलंबोत शेवटपर्यंत खेळून त्यानं नाबाद 145 धावा काढल्या. त्यावेळी त्यानं तिसऱ्या क्रमांकाऐवजी डावाची सुरुवात केली होती…2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरात 92, 2018 साली इंग्लंडविरुद्ध नाबाद 132 व 51, 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड इथं 123, 2021 साली सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच 77 अन् त्याच वर्षी ब्रिस्बेनमध्ये 156…या खेळींमध्ये त्याची नांगर टाकण्याची वृत्ती व जिद्द पुरेपूर दिसून आली…चेतेश्वर पुजाराला भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ बनणं कधीच जमलं नाही. त्याचं वर्णन पाय जमिनीवर असलेला खेळाडू असंच करावं लागेल !
कारकिर्दीतील महत्त्वाची वैशिष्ट्यां…
- चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीतलं 2017 हे सर्वोत्तम वर्ष…त्यानं 67.05 च्या सरासरीनं 11 कसोटी सामन्यांत नोंद केली ती चार शतकांची व पाच अर्धशतकांची…त्यानं एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा एकदाच पार केला तो त्या वर्षी…
- चेतेश्वरनं कसोटींत तीन दुहेरी शतकं फटकावलीत. त्यानं सर्वांत जास्त नाबाद 206 धावा काढल्या त्या अहमदाबाद इथं 2012 साली इंग्लंडविरुद्ध. खेरीज ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद इथं खेळताना 204 व 2017 मध्ये त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रांची इथं 202 धावा…
- तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना त्यानं 6529 धावा जमविल्या. त्यात समावेश 18 शतकांचा. राहुल द्रविडच्या 10524 धावांचा अपवाद सोडल्यास कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, केन विल्यमसन नि हाशिम अमला या अन्य फक्त चार फलंदाजांनाच तिसऱ्या क्रमांकावर 6 हजारपेक्षा जास्त धावा जमविणं शक्य झालंय…
- 2018-19 मोसमात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पुजारानं 4 कसोटी सामन्यांतील 7 डावांमध्ये 74.42 च्या सरासरीनं जमविल्या 521 धावा. त्यात समावेश तीन शतकांचा व एक अर्धशतकाचा. सिडनीत त्यानं 193 धावांची खेळी केली होती…
- चेतेश्वरनं अफगाणिस्तान वगळता कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविऊद्ध शतक झळकावलं. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला फक्त एकदाच खेळता आलं. त्यानं ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविऊद्ध प्रत्येकी पाच, तर श्रीलंकेविऊद्ध चार शतकं झळकावली…
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विलक्षण दबदबा राहिलेल्या पुजाराच्या खात्यावर तिथं आहेत ती 18 द्विशतकं. याबाबतीत त्याला लाभतं इतिहासातील पाचवं स्थान. खेरीज सौराष्ट्रतर्फे 2008-09 मध्ये ओरिसाविऊद्ध नाबाद 302, 2012-13 साली कर्नाटकविऊद्ध 352 आणि 2013-14 मध्ये भारत ‘अ’तर्फे वेस्ट इंडिज ‘अ’विऊद्ध नाबाद 306 अशी तीन त्रिशतकं झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू. नंतर सहकारी रवींद्र जडेजानं या कामगिरीशी बरोबरी केली…

– राजू प्रभू









