वृत्तसंस्था/ कोलकाता
स्टीलच्या किमती या सध्याला नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत आणि त्या आता आणखी कमी होण्याची शक्यता धुसर आहे. उलट सध्याच्या पातळीपेक्षा किमती आता यापुढे वाढण्याचीच शक्यता आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने या संदर्भात माहिती दिली आहे.
देशांतर्गत बाजारात स्टीलची किंमत जवळपास 40 टक्क्यांनी घसरून 55,000-57,000 रुपये प्रति टन झाली आहे. एप्रिलच्या अखेरीपासून स्टीलच्या किमतीत घसरण सुरू झाल्याचे दिसत असल्याचेही ते म्हणाले आहेत.
जेएसडब्ल्लू स्टीलचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी शेषगिरी राव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पोलादाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता नाही. जागतिक उत्पादनात 6.2 दशलक्ष टनांनी घट झाली आहे. पुढे ते म्हणाले, जागतिक पुरवठय़ातील सुधारणा आणि भारतातील स्टीलचा अधिक वापर यामुळे किमती स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
2021-22 च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मार्चपर्यंत देशांतर्गत स्टीलची मागणी वाढून 11.5 कोटी टन होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर सप्टेंबरला संपलेल्या सहामाहीत एकंदर पाहता पोलाद विक्रीत कंपनीने 30 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. सहामाहीत पोलाद उत्पादन 11 टक्के इतके वाढले होते.









