‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती; गाय दुध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रूपयांनी वाढ; 1 ऑगस्टपासून वाढीव खरेदी दर व 31 जुलै मध्यरात्रीपासून विक्री दर होणार लागू; ग्राहकांना प्रतिलिटर 60 रूपये दराने खरेदी करावे लागणार दुध
Gokulmilkrate –
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडून म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये 1 ऑगस्टपासून वाढ केली जाणार आहे. म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर 2 रूपये व गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर 1 रूपये वाढ केली आहे. 27 जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. तसेच संघाच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्ये वितरीत होणाऱया फुल क्रीम दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ केली जाणार आहे. गाय दूध, टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.
1 ऑगस्टपासून म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर 45.50 रूपये दर राहिल व गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर 30 रूपये असा दर राहिल. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
विक्री दरात चार महिन्यात 6 रूपयांची वाढ
31 जुलैच्या मध्यरात्रीपासून दूध विक्री दरवाढ लागू होणार आहे. ‘गोकुळ’ने 16 एप्रिल रोजी विक्री दरात तब्बल 4 रूपये वाढ केली होती. यावेळी विक्री दर प्रतिलिटर 54 रूपयांवरून 58 रूपये झाला होता. आता सुधारीत दरवाढ लागू झाल्यानंतर प्रतिलिटर 60 रूपये दर होणार असून ग्राहकांवर त्याचा अर्थिक भार पडणार आहे.









