कोल्हापूर :
जिह्यातील सर्व महा–ई–सेवा केंद्राकडून सर्वसामान्य ग्राहकांची ऑनलाईन दाखल्यासाठी मनमानी पद्धतीने आर्थिक लुबाडणूक होत आहे.यासाठी सर्व केंद्र चालकांनी, शासनाने ठरवून दिलेले दरफलक आपल्या कार्यालयाच्या दर्शनी लावावेत, अशी मागणी जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हंटले आहे, राज्य सरकारने नागरिकांना आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्रासाठी सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या हेतूने, संबंधित केंद्र चालकांना महा–ई–सेवा केंद्र तसेच संबंधित कार्यालयाचे परवाने दिले आहेत.या सर्व केंद्रांमध्ये विविध स्वरूपाच्या दाखल्यांसाठी, नागरिकांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये म्हणून, शासनाने सर्वच केंद्रासाठी सेवेनुसार एकसमान दर निश्चित केले असून, संबंधित केंद्र संचालकांनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात दरफलक न लावल्यामुळे, आगाऊ शुल्क घेऊन, मनमानी व चुकीच्या पद्धतीने आर्थिक फसवणूक आणि लूट केली जात आहे.
जिह्यातील सर्वच महा ई सेवा केंद्राच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेल्या दरफलकाची माहिती लावण्याबाबत, संबंधित संचालकांना आदेश द्यावेत व ते बंधनकारक करावेत. तसेच याबाबतीत योग्य ती सकारात्मक कारवाही न केल्यास, त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करुन त्यांचा अधिकृत परवाना रद्द करावा.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर, संजय सासने, भगवान माने, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, बाळासाहेब कांबळे, रावण समुद्रे, संतराम जाधव आदी उपस्थित होते.








