भारताची भूमिका ः रशियाने मानले आभार ः राजदूत पवन कपूर यांची उपपंतप्रधानांनी घेतली भेट
वृत्तसंस्था / मॉस्को
जी-7 देशांकडून रशियन कच्च्या तेलावर लावण्यात आलेल्या किंमत मर्यादेला (प्राइस कॅप) भारताने समर्थन दर्शविलेली नाही. भारताच्या या भूमिकेसाठी रशियाने आभार मानले आहेत. रशियाचे उपपंतप्रधान एलेक्झेंडर नोवाक यांनी भारताचे राजदूत पवन कपूर यांची भेट घेत भूमिकेबद्दल कौतुक केले आहे.
रशियन कच्च्या तेलावर लादण्यात आलेल्या प्राइस कॅपचे भारत समर्थन करणार नसल्याचे या भेटीनंतर रशियाच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत म्हटले आहे. रशिया जबाबदारीपूर्वक संकटादरम्यान पूर्ण जगात ऊर्जेच्या साधनसामग्रीचा पुरवठा करत असल्याचा दावा उपपंतप्रधान नोवाक यांनी केला आहे. 2022 च्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाची होणारी आयात वाढून 16.35 दशलक्ष टन झाल्याची माहिती रशियाच्या विदेश मंत्रालयाने दिली आहे.
प्राइस कॅप अमान्य
आम्ही स्थितीचा आढावा घेत आहेत. अशाप्रकारच्या निर्बंधयुक्त प्राइस कॅपला सामोरे जाण्यासाठी आम्ही काही प्रमाणात तयारी केली होती. आम्ही प्राइस कॅप स्वीकारणा नाही, तसेच मूल्यांकन संपल्यावर कशाप्रकारे पुढील काळात वाटचाल करण्यात येईल हे कळविले जाणार असल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटले आहे.
रशियावर निर्बंध
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. पाश्चिमात्य देश आता रशियाच्या कच्च्या तेलावर प्राइस कॅप लादून त्याची आर्थिक स्थिती कमकुवत करू पाहत आहेत. रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीतून मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळत असतो.
5 डिसेंबरपासून लागू
रशियाच्या कच्च्या तेलावरील प्राइस कॅप 5 डिसेंबरपासून लागू झाला आहे. पाश्चिमात्य देशांमधील सरकारांनी रशियन कच्च्या तेलाच्या किमतीवर बंधन आणण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियन कच्च्या तेलावरील प्राइस कॅपचा निर्णय अपुरा असल्याचा दावा केला आहे.
भारतावरील प्रभाव
प्राइस कॅपमुळे भारताला नुकसान सहन करावे लागू शकते. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे अनेक पाश्चिमात्य देशांना रुचलेले नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली होती, परंतु भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबविलेली नाही. भारत सध्या रशियन कच्च्या तेलासाठी ब्रेंटपेक्षा 15-20 डॉलस प्रति बॅरलने रक्कम देत आहे. याचाच अर्थ उपलब्ध कार्गोची किंमत देखील प्राइस कॅपच्या आसपासच आहे. याचमुळे प्राइस कॅप लागू झाल्यावरही भारतावर फारसा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता नाही, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 10 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत.









