संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : गोव्यात ‘नेव्हल वॉर कॉलेज’चे राष्ट्रार्पण,‘चोल भवन’द्वारे पराक्रमी साम्राज्याचा गौरव
पणजी : नौदलाचे वाढते सामर्थ्य हे वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे किंवा शत्रूंपासून आमचे संरक्षण करण्यासाठी नव्हे तर हिंद-प्रशांत महासागर परिसरात सुरक्षा, शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. यापूर्वीच्या बहुतेक सरकारांनी जमिनीच्या सीमा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले, परंतु सागरी धोक्यांना तितकेसे महत्त्व दिले नव्हते, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. काल मंगळवारी बेती वेरे येथे आयएनएस मांडवीत नेव्हल वॉर महाविद्यालयासाठी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
पराक्रमी चोल साम्राज्याला आदरांजली
‘चोल भवन’ असे नाव देण्यात आलेल्या या आधुनिक वास्तूने प्राचीन भारतातील चोल राजघराण्याच्या पराक्रमी सागरी साम्राज्याला आदरांजली वाहिली आहे. ‘चोल’ भवन’ हे नौदलाच्या आकांक्षांचे प्रतीक आणि भारताच्या सागरी उत्कृष्टतेचा वारसा आहे. त्याचबरोबर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या आणि आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान वाटण्याच्या भारताच्या नव्या मानसिकतेचेही ते प्रतिबिंब आहे, असे सिंह यांनी पुढे सांगितले. या सोहळ्यास त्यांच्या सोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सागरी धोक्यांकडेही आता लक्ष
हिंद महासागर क्षेत्रात आमच्या शत्रूंच्या वाढलेल्या हालचाली आणि या क्षेत्राचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता, आमच्या धोक्याच्या जाणिवेचे पुनर्मूल्यांकन करणे आणि त्यानुसार आमची लष्करी संसाधने आणि धोरणात्मक लक्ष पुन्हा संतुलित करणे आवश्यक आहे. यापूर्वी बहुतेक सरकारांनी जमिनीच्या सीमा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले होते, परंतु सागरी धोक्यांना तितकेसे महत्त्व दिले जात नव्हते, असे सिंह म्हणाले.
राजकारण व संस्कृतीचे संबंध प्राचीन काळापासून
नौदल, हवाईदल आणि सैन्यदल यांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने देशाची तयारी सुरू आहे. देशी तंत्रज्ञानाच्या वापरात युद्धासाठी विमाने आणि नौका बांधण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. राजकारण आणि संस्कृती यांच्यात ऐतिहासिक काळापासून संबंध आहेत. चोल साम्राज्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतही संस्कृती, ठेवा यांना महत्व होते, असे सिंह यांनी पुढे सांगितले.
देशाच्या पुनऊत्थानाचे प्रतीक
अॅडमिरल हरी कुमार यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी सागरी सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी उच्च लष्करी शिक्षणाची अपरिहार्य भूमिका अधोरेखित केली. आज उद्घाटन करण्यात आलेली नवीन प्रशिक्षण सुविधा केवळ भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर शेजारी देशांसाठी देखील सागरी दृष्टीकोन शिकण्यासाठी गुऊकुल आणि देशाच्या पुनऊत्थानाचे प्रतीक म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीटही यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. चोल इमारत सशस्त्र दलाला समर्पित करण्यापूर्वी त्यांनी गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली.