ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Preventive action against two workers of PFI in the Ahamadnagar संपूर्ण देशभरात पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांवर कारवाया सुरू असताना नगर जिल्ह्यातही स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मंगळवारी दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. न्यायालयाने या दोघांचेही बंधपत्र घेऊन त्यांची सुटका केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दंगली घडविणे, टेरर फंडिंग आदी आरोपांवरून देशभरात एनआय, एएटीएसकडून पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अशातच नगर शहरात व संगमनेर तालुक्यात स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उडाली आहे. पोलिसांनी नगर शहरातून पीएफआयचा सक्रिय कार्यकर्ता जुबेर अब्दुल सत्तार शेख (रा. मुकुंदनगर) व संगमनेर येथून मोहम्मद खलील दिलावर शेख या दोघांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
अधिक वाचा : सहा दिवसांच्या मुलीची पुण्यातील दोन तृतीयपंथीयांना विक्री
नगर न्यायालयात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी बाजू मांडली. देशभरात सुरू असलेल्या घटना पाहता जुबेर शेख यांच्याकडून नगर शहरातही काही घटना घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय असल्याने त्याला स्थानबद्ध करावे, अशी मागणी केली होती. न्यायालयाने याच्या वकिलाचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात कोणतीही ऍक्टिव्हिटी न करण्याच्या अटीवर बंधपत्र घेऊन त्याची मुक्तता केली.
तर संगमनेर येथे मोहम्मद शेख याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील महिनाभराच्या कालावधीत कोणतीही ऍक्टिव्हिटी न करणे, दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी देणे, बाहेर जाताना पोलिसांना तेथील पत्त्याची माहिती कळवणे, अशा अटी घालून बंधपत्र घेत न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर त्याची सुटका केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.








