बिम्सचे प्राध्यापक डॉ. आर. जी. विवेकी यांची माहिती : वेळेत उपचार आवश्यक
बेळगाव : माता मृत्यूबाबत निश्चितता नसली तरी बहुतेक प्रकरणांमध्ये ते टाळता येण्यासारखे आहे. माता मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अनेक कारणांपैकी कसोटी नंतरच्या काळात अति रक्तस्त्राव होणे, संसर्गिक संक्रमण त्याचबरोबर अधिक असणारा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग, रक्ताचे आजार, कुपोषण, अशक्तपणा, मातेचे वाढते वय किंवा कमी वय इत्यादी कारणामुळे मातांचा मृत्यू होऊ शकतो. माता मृत्यू दरामध्ये सुधारणा झाली असली तरी ही वेळेत उपचार झाल्यास माता मृत्यू दर आणखीन कमी करणे शक्मय आहे, अशी माहिती बिम्सचे प्राध्यापक व कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. विवेकी यांनी दिली.
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसुती विभागात गेल्या वर्षभरापासून सातत्याने बाळंतिणींचा मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधता, त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गर्भधारणा हा आई आणि त्याच्या जोडीदारासाठी संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा काळ असतो. ही एक नैसर्गिक देणगी असून वैवाहिक कुटुंबासाठी एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक गरोदर माता गरोदरपणात निरोगी व सुदृढ राहून गोंडस बाळाला जन्म देण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा असणे यात काही गैर नाही. परंतु गर्भारपणी योग्य ती काळजी घेतली नाही तर हा काळ मानसिक व शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो. गर्भधारणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अनेक अंतर्गत शारीरिक बदलामुळे गुंतागुंत होण्याचा धोका वाढून मृत्यू देखील ओढवतो.
गर्भधारणेची संबंधित किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे (अपघाती किंवा आकस्मिक कारणे वगळून) गर्भधारणे दरम्यान किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत त्याचा मृत्यू झाल्यास त्याला माता मृत्यू म्हटले जाते, असे त्यांनी नमूद केले. गर्भवतीने कोणती काळजी घ्यावी या प्रश्नावर ते म्हणाले, मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर तात्काळ तज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून घेऊन प्रसूती होईपर्यंत स्वत:ची तब्येत, गर्भाची वाढ बरोबर असल्याची खात्री करून घेणे व सांगितलेल्या वेळी वेळेत तपासणी करून दिलेल्या औषधे गोळ्या, इंजेक्शन घेणे जऊरीचे ठरते. कोणताही शारीरिक त्रास सहन न करता मोकळेपणाने घरातील व्यक्तींना सांगून वेळीच उपचार घेणे हितावह ठरते.‘आय एम अ मॉम, आय एम अ सुपर हिरो’ असे प्रत्येक गरोदर मातेला वाटण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन बिम्सचे प्राध्यापक डॉ. विवेकी यांनी केले.
कुटुंबाची जबाबदारी
गरोदर व्यक्तीला पौष्टिक आहार व तज्ञ वैद्याकडे दाखविण्यासाठी प्रवृत्त करणे व स्वत: पुढाकार घेणे ही घरातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. अनुभवी व्यक्तीने मानसिक धीर देणे हितावह ठरते. गर्भवती कोणत्याही मानसिक तणावाखाली राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येकाने घ्यायला हवी. प्रसूतीच्या वेदना सुरू होईपर्यंत गरोदर मातेला घरी ठेवणे, दिलेली औषधे वेळेत घेण्यास सांगावे, तिला हालचाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान सहान कामे तिला लावण्यास हरकत नाही. परंतु अतिकष्टाची कामे तिला लावू नयेत. सुरक्षिततेसाठी किंवा अतिदक्षतेसाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या व औषधे (महागडी असली तरीही) घेण्यास विरोध करणे घातक ठरू शकते, असेही डॉ. विवेकी यांनी सांगितले.
डॉक्टरांची जबाबदारी
गरोदरपणा व प्रसूती नैसर्गिक प्रक्रिया असली तरी वैद्यकीय शास्त्रानुसार उपलब्ध असलेल्या संभाव्य सर्व गुंतागुंतीचे भान ठेवून प्रत्येक गरोदर मातेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुदृढ मातेसाठी व बाळासाठी गरोदरपणापासून प्रसुतीपर्यंत कटाक्षाने शास्त्राsक्त पद्धतीने उपचार देणे गरजेचे आहे. नैसर्गिक व सिजेरियन प्रसूती नंतर किमान 48 ते 72 तासापर्यंत सूक्ष्म निरीक्षण ठेवणे गरजेचे असते. काही गुंतागुंत उद्भवल्यास ती हाताळण्याची उपकरणे, औषधे व प्रशिक्षित सहकारी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक हॉस्पिटलचे कर्तव्य आहे. जर गुंतागुंत वाढली व आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय यंत्रणा व तज्ञ डॉक्टरांचा अभाव असेल तर त्या महिलेला मोठ्या हॉस्पिटलकडे पाठवण्याची जबाबदारीही डॉक्टरांचीच आहे. प्रत्येक गर्भवती एका जीवाला जन्म देणार आहे. हे तिचे कुटुंबीय, डॉक्टर, ती नोकरदार असेल तर तिचे सहकारी या सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.









