महिला कल्याण-ओअॅसिस संस्थेकडून जनजागृती रॅलीचे आयोजन
बेळगाव : बेंगळूरनंतर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलांची विक्री होत आहे. महिला व मुलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी महिला कल्याण संस्था आणि ओअॅसिस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूर ते मुंबई जनजागृती रॅली आयोजित केली आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यकर्त्या वैजयंती चौगुले, संगीता एस. यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेळगाव शहरात शेजारील महाराष्ट्र, गोवा यांसह पश्चिम बंगाल आदी राज्यांतील महिलांची विक्री करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार वाढले आहेत. पोक्सो प्रकरणांची नोंद अधिक होत आहे. लहान मुलांना भिक्षा मागण्यास प्रवृत्त केले जात आहे. हे रोखण्यासाठीच संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बेंगळूर ते मुंबई जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. पथनाट्याद्वारे शाळा-महाविद्यालयांत जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विदेशातील सहा नागरिकांचाही समावेश आहे. महिला आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी उज्वला केंद्र उपलब्ध असून याद्वारे अनेकांना मदत केली आहे. महिला व मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या भविष्यासाठी मदत करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.









