अन्यथा सत्तरीत पाण्याचे दुर्भिक्ष्य ; शेती-बागायती येणार धोक्यात
प्रतिनिधी /वाळपई
केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविल्यास त्याचा फटका सत्तरीला अधिक बसणार आहे. सत्तरीला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार असून दाबोस जलशुद्धीकरण प्रकल्पावर विपरीत परिणाम होणार आहे. शेती, बागायती सुकून धोक्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने कणखर भूमिका घेत म्हादईचे पाणी वळविण्यास वेळीच विरोध केला नाही तर त्याचे दुष्परिणाम भविष्यात गोमंतकीयांना भोगावे लागतील, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
कर्नाटक सरकारच्या आठमुठय़ा धोरणामुळे भविष्यात पाणी तुटवडा जाणवणार असून ग्रामीण भागातील जनतेचे जीवन उध्वस्त होणार आहे. गोवा सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी प्रतिक्रिया साटे पंच सदस्य लक्ष्मण गावस यांनी व्यक्त केली आहे.
म्हादईचे पाणी वळविल्यास त्याचा परिणाम सत्तरीतील 70 टक्के गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱया दाबोस पाणी प्रकल्पावर होणार आहे. कर्नाटकच्या खेळीमुळे म्हादईचे पाणी आटणार आहे. यामुळे दाबोस प्रकल्पाला आवश्यक पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी पाणी शुद्धीकरण कमी होणार असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. सध्या हा प्रकल्प 15 एमएलडी क्षमतेचा आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र कर्नाटकच्या या खेळीमुळे दाबोस पाणी प्रकल्प धोक्मयात येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दाबोस येथील युवा कार्यकर्ते अंकुश धुरी यांनी व्यक्त केली आहे.
कर्नाटकच्या या खेळीमुळे गोव्याची मोठय़ा प्रमाणात पाण्याची नुकसानी होण्याची शक्मयता आहे. यामुळे गोवा सरकारने याबाबत अधिक कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम शेती बागायती बरोबरच सिंचनावर होणार आहेत असे धुरी म्हणाले.
शेती, बागायती ओसाड पडणार
सत्तरीत म्हादई नदीवर अनेक ठिकाणी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱयातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होते. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत आहे. म्हादई वळविल्यास पाणी कमी पडणार असून त्याचे परिणाम शेती, बागायतीवर होणार आहेत. यामुळे सत्तरीतील शेती, बागायती धोक्यात येणार असून शेतकरी उपाशी राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी राघोबा धूरी यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण पाणी समस्या उद्भवणार
गोवा सरकारने म्हादई बचाव अंदोलना अंतर्गत हालचाली सुरू केल्या असताना सुद्धा कर्नाटक सरकार मात्र आपले इस्पित साध्य करण्यास यशस्वी ठरले. यामुळे गोवा सरकार कमी पडले की काय असा सवाल नारायण? गावकर यांनी उपस्थित केला आहे. सत्तरातील अनेक गावांत आजही पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. कर्नाटक सरकारच्या याधोरणामुळे पाण्याची भीषण समस्या भविष्यात उद्भवणार आहे, असे गावकर म्हणाले.
उपसा योजना बंद पडणार
नदीच्या पाण्याच्या साठय़ावर उभारण्यात आलेल्या बंधाऱयातून उपसा योजनेतून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लाखो चौरस मीटर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. कर्नाटकच्या या हेकेखोरपणामुळे उपसा योजना बंद पडणार असून ओलिताखाली आलेली जमीन पुन्हा ओसाड पडण्याची भीती गोपाळ गावकर यांनी व्यक्त केली आहे.









