खोर्जुवे हळदोणा येथील घटना : आठ दिवस उलटले तरी चोरटय़ांचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश
प्रतिनिधी /म्हापसा
हळदोणा खोर्जुवे येथील अंगणवाडी सेविका दीपाली दिलीप पोळे यांचे गळय़ातील मंगळसूत्र, हातातील गोट आदी दागिने मिळून सुमारे साडेसहा लाखांचे दागिने अज्ञात चोरटय़ांनी हातोहात लंपास केल्याची घटना अलीकडेच हळदोणा खोर्जुवे येथे घडली.
या घटनेला आठ दिवस उलटले मात्र अद्याप चोरटय़ांचा थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी आरोपींना शोधून काढावे व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पोळे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी त्यांच्यासमवेत समाजसेवक प्रवीण आसोलकर, दिलीप पोळे, देवीदास पणजीकर उपस्थित होते.
बदल्यात हातात दिल्या खोटय़ा बांगडय़ा
त्या म्हणाल्या, सकाळी आपण अंगणवाडीमध्ये जात असताना वाटेत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आपण पोलीस अधिकारी असून आम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे, येथे मोठय़ा प्रमाणात चोऱया होतात. गळय़ातील व हातातील दागिने पर्समध्ये ठेवण्याची सूचना केली. त्यांनी आपली पर्स घेऊन पडताळून पाहिली व सर्व दागिने एका पेपरमध्ये घालून आत पर्समध्ये ठेवले. दुपारी आंगणवाडीतून घरी जाताना भाच्याने घरापर्यंत सोडले. घराबाहेरच मंगळसूत्र घालण्यासाठी पर्समधून काढले असता त्या पेपरमध्ये बनावट सोन्याच्या रंगाची बांगडी आढळून आली. आपण घडलेली हकीकत घरच्यांना सांगून नंतर हळदोणा पोलीस आउटपोस्ट येथे तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
सबंधित अंगणवाडी सेविकेचा भाऊ देवीदास पणजीकर म्हणाले की, आम्ही हळदोणा आऊट पोस्टवर तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी आमची तक्रार घेण्यास नकार दिला. आमचे आमदार कार्लुस यांना आऊट पोस्टवर तक्रार घेण्यास कुणी नसल्याची माहिती दिली मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. ते आमदार झाल्यापासून होऊन हळदोण्यात गुन्हे वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून वाढत्या चोरीच्या घटनांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
प्रवीण आसोलकर म्हणाले, यापूर्वी दत्तवाडी म्हापसा येथेही अशीच घटना घडली होती. पोलिसांनी चोरटय़ांना पकडण्यास सहकार्य करावे, असे ते म्हणाले. दरम्यान, पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता चोरटय़ाचा शोध सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.









