हिंडलगा गणपती मंदिर परिसरातील घटना
बेळगाव : पोलीस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धेच्या अंगावरील चार तोळ्यांचे गंठण पळविले आहे. मंगळवार दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सरिता सुरेश पाठक (वय 64) रा. पार्वतीनगर, उद्यमबाग या दुचाकीवरून उचगावला जात होत्या. हिंडलगा गणपती मंदिराजवळ असलेल्या पेट्रोलपंपानजीक एका भामट्याने त्यांना अडविले. आपण पोलीस असल्याचे सांगत ओळखपत्रही दाखविले. पुढे लुटमारीची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनांची तपासणी सुरू आहे. तुमच्या अंगावरील दागिने काढून द्या, असे सांगितले. भामट्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सरिता यांनी आपल्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र काढून त्याच्या हातात ठेवले. तोपर्यंत मोटारसायकलवरून दुसरा भामटा तेथे आला. वरिष्ठ अधिकारी आमची प्रतीक्षा करीत आहेत, लवकर चल, असे सांगून त्याला मोटारसायकलवर घेतले व दोघे तेथून सुसाट वेगाने निघून गेले. सरिता यांनी आरडाओरड करेपर्यंत भामटे पसार झाले होते.









