दख्खन नगरीत कामदा एकादशीपासून चैत्र यात्रेस प्रारंभ
वार्ताहर/जोतिबा डोंगर
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथील केदारनाथांची तथा जोतिबाची यात्रा शनिवारी 12 रोजी होत आहे. मंगळवारी कामदा एकादशीपासून चैत्र यात्रेस प्रारंभ झाला. जोतिबा डोंगरावर भाविक सासनकाठ्या घेऊन भाविक दाखल होऊ लागले आहेत. बेळगाव, लातूर, बार्शी, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बीड, सातारा, पुणे परिसरातील काही सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. संपूर्ण डोंगर परिसर भाविकांनी फुलला आहे. हलगी, पिपाणीच्या तालावर नाचणारे भाविक ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’चा अखंड गजर करत आहेत. त्यामुळे दख्खननगरीतील वातावरण चांगभलंमय, मंगलमय बनत आहे. श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर परंपरेनुसार मंगळवारी कामदा एकादशीला बेळगाव येथील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील सासनकाठ्या नंदी, नगारा, बैल गाड्या, डोक्यावर जोतिबाची चांदीची मूर्ती घेऊन निगवे दुमाला, कुशीरे फाटामार्गे गायमुख तलावाशेजारी असणाऱ्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेऊन दक्षिण दरवाजामार्गे, जोतिबा मंदिर आवारात दाखल झाल्या. ग्रामस्थांनी सर्व भाविकांचे स्वागत, मानपान केले. बेळगावच्या भाविकांनी मंदिराभोवती पारंपरिक पध्दतीने सासनकाठीच्या पाच प्रदक्षिणा काढल्या.









