म्हापसा येथील आरटीआय प्रकरण, पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कृत्याबाबत नाराजी
म्हापसा : म्हापसा परिसरात आपण आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगून म्हापसा नगरपालिकेच्या महिला कामगारांना धमकावल्यानंतर त्या आयटीआय कार्यकर्त्या विरोधात महिला वर्गांनी पोलिसात एफआयआर दाखल केला. ती तक्रार मागे घेण्यासाठी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी आरटीआय कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्या महिला कर्मचारी वर्गावर दबाव आणत असल्याची माहिती म्हापसा पालिकेतील नगरसेवकांनी ‘तऊण भारत’ला दिली. विशेष म्हणजे म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी मात्र आपल्या कर्मचारी वर्गाच्या पाठीशी राहण्याचे सोडून त्या आरटीआय कार्यकर्त्यांना पाठिंबा देत आहेत. काही नगरसेवक याविरोधात मुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार, मंत्र्याची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. या आरटीआय कार्यकर्त्यांमुळे सर्व पालिकेची कामे अडकून पडलेली असून अधिकाऱ्यांना आरटीआय कामातच येथे राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.
मुख्याधिकाऱ्यांची त्या आरटीआय कार्यकर्त्यांशी हातमिळवणी
आरटीआय कार्यकर्ता म्हटले की त्याने पालिकेत येऊन तक्रार द्यावी व माहिती मिळाली की घेऊन जावी मात्र हे आरटीआय कार्यकर्ते पालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात वा इतरत्र फाईल्स चाळताना पहायला मिळतात. विशेष म्हणजे मुख्याधिकारी त्यांना घाबरून परस्पर सर्व फाईल्स व पालिकेतील कुणाचीही गुप्त माहिती त्या आरटीआय कार्यकर्त्यांना स्वत:हून देतात. यामुळे त्यांचे आयतेच फावते असा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. म्हापशात आरटीआय कार्यकर्ते म्हणणाऱ्या दोघांविरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. अलीकडेच मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून 309 व्यापाऱ्यांना म्हापशात नोटीस बजावण्यास भाग पाडले होते. त्या वृत्तीचा म्हापसा व्यापारी संघटनेने त्या आरटीआय म्हणणाऱ्यांचा जाहीर निषेध केला होता. म्हापसा पालिका मुख्याधिकारी यात गुंतले असल्याने त्यांच्याही वृत्तीचा निषेध होत आहे.








