व्हाईट हाऊसचे प्रतिपादन, भवितव्य त्वरित स्पष्ट
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लागू केला आहे. अशाप्रकारे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीवर 50 टक्के कर लागू होत आहे. याचे कारण रशिया-युक्रेन युद्ध थांबावे हेच आहे. भारतावरील या अतिरिक्त कराचा हेतू युद्ध थांबणे हा आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या वक्तव्याचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत.
भारतावर दबाव आणण्याचा आमचा हेतू नव्हता, असे अमेरिकेने अप्रत्यक्षरित्या सूचीत केले आहे, असाही या विधानाचा अर्थ लावला जात आहे. रशियावर अप्रत्यक्ष दबाव आणण्यासाठी भारतावर अतिरिक्त 25 टक्के (एकंदर 50 टक्के) कर लागू करण्यात आला. रशिया भारताचा मित्रदेश असून दोन्ही देशांमध्ये घनिष्ट आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे भारतावर कर वाढविल्यास रशियावर युद्ध थांबविण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव येईल, अशी अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक दबाव आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. कारण त्यांची इच्छा हे युद्ध थांबावे, अशी आहे, असे प्रतिपादन व्हाईट हाऊसच्या वृत्तसचिव कॅरोलाईन लेव्हिट यांनी केले. त्या बुधवारी पत्रकारांसमवेत वार्तालाप करीत होत्या.
ट्रम्प किती प्रतीक्षा करणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात व्यापार शुल्क (आयात कर) लागू केला आहे. त्याचे कारण, रशिया-युक्रेन युद्ध थांबावे हे असेल तर ट्रम्प किती काळ प्रतीक्षा करणार आहेत, असाही प्रश्न लेव्हिट यांना विचारण्यात आला होता. रशिया-युव्रेन युद्ध थांबावे, ही ट्रम्प यांची तीव्र इच्छा आहे. त्यांनी ती स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्तही केली आहे. ते अधिक काळ थांबण्यास तयार नाहीत. एक महिनाभर थांबावे आणि रशिया तसेच युक्रेन यांच्यात चर्चा होते काय याची प्रतीक्षा करावी, असा सल्ला त्यांना दिला होता. तथापि, त्यांनी तो मानलेला नाही. त्यांना लवकरात लवकर हे युद्ध थांबवायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत-पाकिस्तान संबंधी पुन्हा वक्तव्य
जगात शांतता नांदावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यासाठी अमेरिका आपल्या सामर्थ्याचा उपयोग करीत आहे. रशियासह सर्व देश अमेरिकेचा पुन्हा आदर करू लागले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्ध आम्हीच थांबविले आहे. या युद्धाचे रुपांतर अणुयुद्धात होऊ शकले असते. हमासकडून इस्रायलच्या काही अपहृत नागरीकांची मुक्तता करण्यासाठी आमचा दबाव उपयोगी पडला आहे. अशाप्रकारे आम्ही जगाच्या आदराला आमच्या सामर्थ्याच्या जोरावर पात्र ठरलो आहोत. ट्रम्प यांनी व्यापाराचा उपयोग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुयुद्ध टाळण्यासाठी केला, असाही दावा त्यांनी केला. भारताने मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीचा सातत्याने इन्कार केला आहे.
27 ऑगस्टनंतर काय होणार…
अमेरिकेने भारतावर प्रथम 25 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. हे शुल्क आता लागू करण्यात आले आहे. त्यानंतर आणखी 25 टक्के दंडात्मक शुल्क लावण्यात आले होते. मात्र, त्याचे कार्यान्वयन 27 ऑगस्टपासून होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 27 ऑगस्टनंतर काय होणार याकडे उत्सुकतेने आणि सावधानतेने पाहिले जात आहे. काही तज्ञांच्या मते येत्या एक आठवड्यात रशिया-युव्रेन युद्धावर काही निश्चित स्वरुपाचा तोडगा निघाला, तर भारतावरचे अतिरिक्त व्यापार शुल्क हटविले किंवा स्थगित ठेवले जाऊ शकते. मात्र, तसे कोणतेही आश्वासन ट्रम्प यांनी दिलेले नाही. त्यामुळे 27 ऑगस्टनंतरच्या परिस्थितीवर भारतात गांभीर्याने विचार केला जात आहे. पर्यायी बाजारपेठांचा शोधही गेल्या दोन महिन्यांपासून घेतला जात आहे.









