इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील एक हिंदू खासदार दानिश कुमार यांच्यावर मुस्लीम खासदारांकडून धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. स्वतः दानिश कुमार यांनीच ही व्यथा पत्रकारांसमोर मांडली आहे. कलमा पढा आणि मुस्लीम व्हा, असे आपल्याला वारंवार सांगण्यात येते, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
कितीही दबाव आला तरी आपण हिंदू धर्म सोडणार नाही. कोणीही मला इस्लामची महती समजावून देण्याचा प्रयत्न करु नये. ज्यांना इस्लामसंबंधी इतकी संवेदनशीलता आहे, त्यांनी आधी अपराधी मुस्लिमांना इस्लामचा अर्थ समजावून सांगावा. नंतर माझ्याकडे धर्म बदलण्याचा आग्रह धरावा, असे त्यांनी ठणकावले आहे. दानिश कुमार 2018 च्या निवडणुकीत आवामी लीग या पक्षाच्या वतीने बलुचिस्तान प्रांतातील अल्पसंख्याकांसाठी आरक्षित असणाऱया मतदारासंघातून निवडून आले आहेत. त्यापूर्वी ते बलुचिस्तान विधानसभेचेही सदस्य होते.
दरवर्षी 1000 मुलींचे धर्मांतर
पाकिस्तानात दरवर्षी हिंदू, शीख आणि ख्रिश्चन अशा 1 हजारहून अधिक मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघामध्येही अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक अल्पवयीन परधर्मिय मुलींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि मुस्लिमाशीं विवाह लावून देणे असे प्रकार पाकिस्तानात नेहमीच घडतात, अशीही माहिती देण्यात आली आहे.









