7 ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजन . सभापती रमेश तवडकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
काणकोण येथील आदर्श युवा संघातर्फे आयोजित 22 वा ’लोकोत्सव’ येत्या 7 डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवाच्या उद्घाटनसाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत लोकसभा सभापतीही उपस्थित राहतील, अशी माहिती संघाचे अध्यक्ष तथा सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
मंगळवारी पर्वरीत विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सचिव अशोक गावकर, खजिनदार दामोदर वेळीप आणि सदस्य रुपेश तवडकर यांची उपस्थिती होती. राज्यातील कला संस्कृतीने समृद्ध असलेल्या ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला, संस्कृती, वनौषधी, खेळ, कृषी, यांचे दर्शन घडविणारा हा लोकोत्सव आमोणे, पैंगीण येथील आदर्शग्राम येथे होणार आहे.
आदर्श युवा संघा, श्री बलराम शैक्षणिक सोसायटी आणि कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया या महोत्सवात देशातील 10 ते 15 राज्यातील कलाकार सहभागी होणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक राज्याचे दालनही असेल. अशी सुमारे 500 दालने थाटण्यात येणार आहेत. त्या दरम्यान, सामुहिक डान्स स्पर्धा, दांडिया, देशभक्ती गीत, वेषभूषा, चित्रकला, पोस्टर, रांगोळी, प्रश्नमंजुषा, कथाकथन, कविता, एकपात्री अभिनय, पथनाटय़, वक्तृत्व, लघुपट, यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. तवडकर यांनी दिली. महोत्सवास भेट देणाऱयांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून यंदा किमान दोन लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.









