प्रजासत्ताक दिन संचलनात होणार सामील
नवी दिल्ली : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यात सामील होण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडून आदिवासी परिवारांना निमंत्रण देण्यात आले आहे. छत्तीसगडच्या कवर्धाच्या काही बैगा आदिवासी परिवारांना राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून तीन परिवारांना निमंत्रण पाठविण्यात आले असून यात एक परिवार जगातिन बैगा आणि त्यांचे पती फूल सिंह यांचा देखील आहे. निमंत्रण मिळाल्याने आमचा परिवार अत्यंत आनंदी असून दिल्लीला जाण्याची तयारी करत आहे. आम्ही यापूर्वी दिल्लीत कधीच गेलो नव्हतो असे फूल सिंह यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी तिन्ही परिवार दिल्लीला पोहोचतील. जेथे त्यांची भेट राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी होईल. राष्ट्रपतींसोबत ते भोजन करणार आहेत. तसेच पंतप्रधान निवासस्थान आणि संसद भवनालाही ते भेट देणार आहेत. बैगा समुदाय विशेष स्वरुपात दुर्बल आदिवासी समूह म्हणून वर्गीकृत आहे. या समुदायाचे वास्तव्य असलेल्या अनेक गावांचा विकास झालेला नाही. राष्ट्रपती मुर्मू या देखील आदिवासी परिवाराशी संबंधित आहेत.









