प्रतिनिधी/ मडगाव
केपे मतदारसंघातील मोरपिर्ला येथील पंतप्रधान श्री सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मारिया मुरेना मिरांडा यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष निमंत्रण मिळाले आहे. मुख्याध्यापिकेने आमंत्रण दिल्याबद्दल आदरणीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानले आहेत.
राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथून आलेले प्रतिष्ठेचे निमंत्रण संगीत आणि धमाकेदार पद्धतीने पोहोचवल्याबद्दल भारतीय पोस्ट ऑफिसचे संजय देसाई (सहाय्यक संचालक आर. ओ. गोवा), अजय कुमार (साहाय्यक अधीक्षक पोस्ट ऑफिस मडगाव), राहुल जाधव (आयपी पीजी गोवा), संतोष कुलकर्णी (मेल मडगाव) आणि इतरांचेही आभार मानले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापिका मारिया मुरेना मिरांडा यांना 36 वर्षांचा अध्यापन अनुभव आहे. त्यांनी मोरपिर्लाच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकले असून 9 वर्षे अनेक आव्हाने असतानाही दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे या हायस्कूलमधील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी समाजातील आहेत.
मारिया मिरांडा या दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवतात. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 3 डी प्रिंटिंग, व्हर्च्युअल चष्मा, अनुभवात्मक शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बॅगलेस दिवस यासारख्या सर्वोत्तम संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.









