सावर्डे भाजपा एसटी मोर्चातर्फे पंतप्रधानांचे आभार
प्रतिनिधी /फोंडा
देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे दौपदी मुर्मू या आदीवासी महिलेची उमेदवार म्हणून निवड करणे ही समस्त आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अत्यंत दुर्गंम भागातील आदिवासी व महिलेची राष्ट्रपती पदासाठी निवड झाली आहे. भाजपामध्येच हे घडू शकते, असे सांगून द्रौपदी मुर्मू या 70 टक्के मतांनी विजयी होतील, असे सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकर यांनी सांगितले.
सावर्डे भाजपा एसटी मोर्चातर्फे फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील उमेदवाराची निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे त्यांनी आभार मानले. येत्या 14 जुलै रोजी श्रीमती मुर्मू या गोव्यात भेट देण्यात असून यावेळी त्या आमदार व खासदारांशी संवाद साधणार आहेत, असे गणेश गांवकर यांनी सांगितले. यावेळी सावर्डे एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर, रिवणचे जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, ऍन्थोनी बार्बोजा, सरचिटणीस मोहन गांवकर व सदस्य कल्पेश गांवकर हे उपस्थित होते.
द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल आदिवासी समाजातर्फे प्रभागवार अभिनंदनाचा ठराव घेऊन त्याची प्रत पंतप्रधानांना पाठविणार असल्याचे प्रभाकर गांवकर यांनी सांगितले. तसेच 24 रोजी राष्ट्रपती पदाचा निकाल जाहीर होताच आदिवासी समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात मिरवणूक काढून प्रत्येक पंचायतीमध्ये त्यांचा फोटो लावण्यात येणार आहे. प्रभाकर गांवकर म्हणाले देशभरात आदिवासीची लोकसंख्या 11 कोटी तर गोव्यात 2 लाख आहे. आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करणे हा या समाजाचा गौरव असून गोव्यातील सर्व आमदारांनी त्यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.









