ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर युपीएकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. यातच युपीए राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कमांडोजची ‘झेड’ श्रेणीची (Z Security) सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली आहे. (Presidential Election News)
यशवंत सिन्हा हे युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीआरपीएफच्या (CRPF) व्हीआयपी सुरक्षा शाखेला सिन्हा (84) यांच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आल्यानंतर सिन्हा यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांनी स्वीकारली आहे. सिन्हा यांच्याशिवाय केंद्राने एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनाही झेड प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
दरम्यान, NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुर्मू यांनी संसद भवनातील राज्यसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. तर, सिन्हा २७ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असून, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.